Virat Kohli’s century 500th Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारताने ४ विकेट्स गमावून २८८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने पुढे खेळायला सुरुवात करताच स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचे ७६वे शतक पूर्ण केले. कोहलीचा हा ५००वा आंतरराष्ट्रीय सामना असून या सामन्यात शतक झळकावताच एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या २८८ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विराट नाबाद ८७ आणि जडेजा ३६ धावांवर खेळत होता. विराट आपल्या कसोटी कारकीर्दीतील २९व्या कसोटी शतकापासून फक्त १३ धावा दूर होता. त्यानंतर जडेजाने आक्रमक सुरुवात करत १०५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर विराट कोहलीने परदेशी भूमीवरील आपला शतकांचा दुष्काळ संपवत आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७६वे शतक झळकावले. त्याने त्याच्या शतकी खेळीला १० चौकारांचा साज चढविला. त्याने १८० चेंडूत १०१ धावा केल्या असून तो सध्या खेळपट्टीवर टिकून आहे. ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. सध्या टीम इंडिया ३२० धावांवर ४ विकेट्स अशी धावसंख्या झाली असून वेस्ट इंडीज विकेट्सच्या शोधात आहे.

विराटचा ५००वा आंतरराष्ट्रीय सामना

विराटचा हा ५००वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. हा टप्पा गाठणारा तो भारताचा चौथा आणि एकूण १०वा क्रिकेटपटू आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर (६६४), महेला जयवर्धने (६५२), कुमार संगकारा (५९४), सनथ जयसूर्या (५८६), रिकी पाँटिंग (५६०), महेंद्रसिंग धोनी (५३८), शाहिद आफ्रिदी (५२४), जॅक कॅलिस (५१९) आणि राहुल द्रविडने (५०९) यांनी अशी कामगिरी केली आहे.

तत्पूर्वी पहिल्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. उपाहारापर्यंत भारताने २६ षटकांत एकही विकेट न गमावता १२१ धावा केल्या होत्या. त्यावेळी टीम इंडिया जवळपास पाचच्या धावगतीने धावा करत होती. वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारतीय संघाने पहिल्या दिवशी एकही विकेट न गमावता उपाहारापर्यंत पोहोचण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी २१ एप्रिल १९७६ रोजी गावसकर आणि अंशुमन यांनी किंग्स्टनमध्ये एकही विकेट न गमावता भारताला लंच ब्रेकमध्ये नेले होते. त्यानंतर पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने विकेट न गमावता ६२ धावा केल्या होत्या. तर १० जून २००६ रोजी दुसऱ्यांदा हा प्रकार घडला. त्यानंतर सेंट लुसियामध्ये पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत वसीम जाफर आणि सेहवागने एकही विकेट पडू दिली नाही आणि १४० धावांची भर घातली. विंडीजकडून केमार रॉच, गॅब्रिएल, वॅरिकन आणि होल्डर यांनी आतापर्यंत प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli scored a century in his 500th international match indias score crossed 310 runs avw
Show comments