यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत रोमहर्षक ठरली. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर पाच गडी राखून विजय मिळवला. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने पूर्ण प्रयत्न केला. मात्र काही चुकांमुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, याच सामन्याविषयी बोलताना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील एका कठीण प्रसंगाविषयी सांगितले आहे. त्यावेळी विराट कोहली रात्रभर झोपू शकला नव्हता. तसेच या एका चुकीमुळे क्रिकेटमधील करिअर संपुष्टात येणार का? असा प्रश्न विराटला सतावत होता.
हेही वाचा >> IND vs Pak : अर्शदीप सिंगवर टीकेची झोड, पण विराट कोहलीने केली पाठराखण, म्हणाला “अशा सामन्यांत…”
विराट रात्रभर झोपू शकला नव्हता
भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत केलेल्या चुकीविषयी भाष्य केले. “खेळामध्ये कोणाकडूनही चूक होऊ शकते. मी माझ्या कारकिर्दीतील पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत होतो. हा सामना पाकिस्तानविरोधात होता. त्यावेळी मी शाहीद आफ्रिदीने टाकलेल्या चेंडूवर अतिशय चुकीच्या पद्धतीने फटका मारला होता. याच एका चुकीमुळे मी त्या दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत झोपू शकलो नव्हतो. रात्री मी फक्त रुमच्या छताकडे पाहत होतो. यावेळी माझे क्रिकेट करिअर धोक्यात येते की काय? अशी भीती मला वाटत होती,” अशी आठवण विराट कोहलीने सांगितली.
हेही वाचा >> “हा तर खलिस्तानी, संघातून बाहेर काढा,” भारत-पाक सामन्यात झेल सोडल्यामुळे अर्शदीप सिंगवर केली जातेय टीका
तसेच पुढे बोलताना खेळामध्ये काही चुका होत असतात. या चुकांपासून धडा घेऊन तशाच परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज राहिले पाहिजे, असे विराटने सांगितले. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान सामन्यात अटीतटीची लढत होत असताना भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने सोडलेल्या झेलवरही त्याने भाष्य केले. जेव्हा आपण प्रचंड दाबावात खेळत असतो तेव्हा अशा चुका होतात. मात्र या चुकांपासून शिकले पाहिजे, असे म्हणत विराटने त्याची पाठराखण केली.
हेही वाचा >> IND vs PAK : ऋषभ अवघ्या १४ धावा करून परतला अन् कॅप्टन रोहित खवळला, लोकांनी पुन्हा घेतलं उर्वशी रौतेलाचं नाव
दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात विराट कोलीने धडाकेबाज फलंदाजी केली. त्यान ४४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या.