भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप गंभीर आणि लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. ३३ वर्षीय कोहलीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो आरशात गंभीर नजरेने स्वत:कडे पाहत आहे.
फोटो पोस्ट करण्यासोबतच कोहलीने एक प्रेरणादायी संदेशही दिला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ”स्वत:ची स्वत:शीच स्पर्धा असते.” विराट सध्या कर्णधारपदाबाबतच्या घडामोडींमुळे चर्चेत आहे. मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराटने टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहलीची वनडे कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत १-२ अशा पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
हेही वाचा – U19 World Cup 2022 : सेमीफायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार; ‘या’ तारखेला होणार महालढत!
दरम्यान, विराट कोहलीचा बीसीसीआयसोबतचा वादही चव्हाट्यावर आला. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितले होते, की त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत सांगितले गेले नव्हते. हा वाद बराच काळ सुरू होता. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली आणि तीन सामन्यांत दोन अर्धशतके झळकावली. मात्र, भारतीय संघाला एकही सामना जिंकता आला नाही.