Virat Kohli Should Play County Cricket says Sanjay Manjrekar : टीम इंडियाचा माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीला इंग्लंडमधील कसोटी मालिकेपूर्वी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. संजय मांजरेकरांच्या मते विराटने गती मिळवण्यासाठी इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळावे. भारत आणि इंग्लंड यांच्यात जून-जुलैमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार असून नुकत्याच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली आपल्या खेळात सुधारणा करण्यासाठी उत्सुक आहे.

संजय माजरेकरांनी विराटला दिला सल्ला –

‘स्टार स्पोर्ट्स’च्या ‘डीप पॉइंट पॉडकास्ट’मध्ये संजय मांजरेकरने भारतीय संघाला इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कसोटी क्रिकेटचा सराव करण्याचा सल्ला दिला आहे. संजय मांजरेकर म्हणाले, “कोहलीला भरपूर कसोटी क्रिकेट खेळण्याची गरज आहे. इंग्लंडमध्ये पहिली कसोटी जूनमध्ये आहे, तर काउंटी चॅम्पियनशिप एप्रिलमध्ये सुरू होईल. तो पुजाराप्रमाणे काऊंटी संघात सामील होऊन त्याला आवश्यक असणारा सराव करू शकतो.”

काऊंटी क्रिकेट खेळणे विराटसाठी शहाणपणाचे –

संजय मांजरेकर पुढे म्हणाले, “यानंतर भारताला सुरुवातीच्या कसोटी सामन्यांमधील कामगिरीचे मूल्यांकन करता येईल. त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्यास तो संघाकडून खेळत राहू शकतो. कोहलीने तिथे जाऊन संघर्ष करावा असे आम्हाला वाटत नाही. हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले होणार नाही. काऊंटी क्रिकेट खेळणे त्याच्यासाठी खूप शहाणपणाचे ठरू शकते.”

हेही वाचा – Rishabh Pant : ऋषभ पंतने कर्णधार होण्यास दिला नकार, ‘या’ कारणामुळे नाकारला मोठा प्रस्ताव

विराट सचिनचा विक्रम मोडण्याचा दावेदार –

क्रिकेट तज्ज्ञ अनेकदा विराट कोहलीला सचिन तेंडुलकरच्या १०० शतकांचा विक्रम मोडण्याचा दावेदार मानतात. कोहलीच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८१ शतके आहेत आणि सचिनचा विश्वविक्रम मोडण्यापासून तो २० शतके दूर आहे. विराट कोहली ३६ वर्षांचा झाला आहे. विराट कोहली २०२७ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात यशस्वी झाला तरी, त्याला दरवर्षी किमान ७ शतके झळकावण्याची गरज आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : “ऋषभने ‘त्या’ मित्रांपासून दूर राहावे”, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोहम्मद कैफने दिला महत्त्वाचा सल्ला

विराट कोहलीचा फॉर्म पाहता हा विक्रम मोडणे आता अशक्य वाटत आहे. विराटने २००८ साली श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या कालावधीत विराट कोहलीने वनडेमध्ये ५० आणि कसोटीत ३० शतकं झळकावली आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये विराट कोहलीच्या नावावर एकमेव शतक आहे.

Story img Loader