ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका विराट कोहलीने चांगलीच गाजवली, पण तिरंगी एकदिवसीय स्पर्धेत मात्र त्याला अजूनही लय सापडलेली दिसत नाही. कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आणल्यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे म्हटले जात असले तरी संघाला गरज असेल तर कोहलीने चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला यावे, असे मत वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिवियन रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे.
‘‘कोणत्याही फलंदाजासाठी चौथा क्रमांक हा नेहमीच चांगला असतो. ऑस्ट्रेलियामध्ये चेंडूला उसळी चांगली मिळत असल्याने सलामीच्या फलंदाजांना बहुतांशी वेळा जास्त काळ फलंदाजी करता येत नाही, त्यामुळेच जर कोहलीसारखा संघासाठी महत्त्वाचा खेळाडू चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर संघाला नक्कीच त्याचा फायदा होईल,’’ असे रिचर्ड्स म्हणाले.
तिरंगी स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोहलीला ९ धावा करता आल्या, तर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला फक्त चार धावाच करता आल्या. कोहलीची तुलना काही वेळा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगशी करण्यात आली. पॉन्टिंग हा तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस यायचा, त्यामुळे कोहलीनेही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, असा एक मतप्रवाह आहे.
‘‘क्रिकेट विश्वामध्ये असा एक मतप्रवाह आहे की संघातील चांगल्या फलंदाजाने तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला यावे. पण परदेशामध्ये तुम्हाला वातावरण आणि प्रतिस्पर्धी यांचा योग्य अंदाज येणे कठीण असते. त्यामुळे परदेशामध्ये तरी संघाचा सर्वोत्तम फलंदाज हा चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला
यायला हवा,’’ असे रिचर्ड्स यांनी सांगितले.
विराटने तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीला का यावे, याबद्दल अधिक रिचर्ड्स यांनी सांगितले की, ‘‘ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ांवर सलामीवीर झटपट बाद होण्याची शक्यता आहे, त्यामध्येच कोहली जर तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीला आला आणि लवकर बाद झाला तर भारतासाठी हा मोठा धक्का बसू शकतो.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा