IND vs AUS 4t Test Day 1 Highlights In Marathi: सध्या सुरू असलेल्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीत जुन्या विराट कोहलीचा अवतार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. विराट कोहलीचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा प्रकर्षपणे चौथ्या कसोटीत दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये स्टंप माईंकवर विराट कोहली सिराजला सूचना देताना दिसत आहे. ज्याचा व्हीडिओही आता व्हायरल होत आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३११ धावा केल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणवीर सॅम कोन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन यांनी अर्धशतक करत चांगली खेळी केली. तर हेड आपले खाते न उघडताच शून्यावर बाद झाला. तर मार्श ४ धावा करत माघारी परतले. भारताकडून बुमराहने ३ विकेट्स आणि आकाशदीप, जडेजा आणि वॉशिंग्टन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
मार्नस लबुशेन आणि मोहम्मद सिराज यांच्यातील वाद पहिल्या कसोटीपासून सुरू आहे. पण यांच्यातील हा वाद आता मैत्रीपूर्ण झाला आहे आणि दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना मजा मस्ती करत डिवचताना दिसतात. या सामन्यातही सिराजने बेल्स बदलल्या आणि लबुशेनला आवाज देऊन सांगितलं की इथे बघ मी बेल्स बदलल्या आहेत. यानंतर पुढच्याच षटकात बुमराहने विकेट घेतली आणि उस्मान ख्वाजाला बाद केलं.
मोहम्मद सिराज आणि लबुशेन यांच्यात अशापद्धतीचं काहीतरी मैत्रीपूर्ण बाचाबाची होत होती. ज्यादरम्यान सिराज हसत त्याच्याशी बोलताना दिसला. हे पाहताच विराट कोहली लगेच सिराजला ओरडला आणि त्याला सांगितलं, यांच्याशी (ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी) हसून बोलू नकोस. विराट कोहली जो कायमच एक कट्टर प्रतिस्पर्धी राहिला आहे. त्याने सिराजला सूचना देत ही कट्टरता कायम ठेवली आहे.
कोहलीची आक्रमकता तर आपणच कायमचं मैदानावर पाहतो, प्रत्येक षटक, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो, हे कायमचं दिसलं आहे. विराटबरोबर कर्णधार रोहित शर्माही मैदानावर खेळाडूंना बऱ्याचदा मार्गदर्शन करताना दिसला. विराटला सिराज ओरडण्यापूर्वी पहिल्याच सत्रात कोन्स्टासबरोबर झालेल्या वादामुळे विराट कोहली चर्चेत आहे. विराट कोहली आणि कोन्स्टास यांच्यात पहिल्याच सत्रात धक्काबुक्की झाल्याने विराट चर्चेत आहे. यानंतर त्याचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.