बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत शतकी खेळी साकारणाऱ्या सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत आगेकूच केली आहे. या सामन्यात साधारण कामगिरी झालेल्या विराट कोहलीची घसरण होऊन तो अव्वल दहाच्या बाहेर फेकला गेला आहे. अद्भुत सातत्यासह खेळणाऱ्या स्टीव्हन स्मिथने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. कुमार संगकारा, एबी डी’व्हिलियर्स आणि हशिम अमला या दिग्गजांना बाजूला सारत स्मिथने अव्वल स्थान ग्रहण केले. सगळ्यात कमी वयात क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा २६ वर्षीय स्मिथ सचिन तेंडुलकर नंतरचा दुसरा फलंदाज आहे. क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाचा २३वा फलंदाज आहे.
मुरली विजयने तीन स्थानांनी सुधारणा करत २०वे स्थान गाठले आहे, तर एकमेव कसोटीतील सामनावीर शिखर धवनने १५ स्थानांनी सुधारणा करत ४५वे स्थान मिळवले आहे. अवघ्या दोन धावांनी शतक हुकलेल्या अजिंक्य रहाणेने चार स्थानांनी सुधारणा करत २२वे स्थान पटकावले आहे. विराट कोहलीची अकराव्या स्थानी घसरण झाली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत रवीचंद्रन अश्विनने एका स्थानाने सुधारणा करत १२वे स्थान मिळवले आहे.

Story img Loader