June 20 is a special day for Indian cricket : भारतात क्रिकेट हा खेळ खूप प्रसिद्ध आहे. क्रिकेट हा येथे धर्म मानला जातो. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूची झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आतुर असतात. भारतात क्रिकेटची वेगळीच आवड आहे. २० जून ही तारीख भारतीय संघासाठी खूप खास आहे. या दिवशी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली, सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सुपरस्टार फलंदाज विराट कोहली यांनी भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले होते.
१. विराट कोहली
२० जून २०११ रोजी भारतीय संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून आजपर्यंत तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा राहिला आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले. कोहलीने भारतासाठी ११३ कसोटी सामन्यांमध्ये २९ शतकांसह ८८४८ धावा केल्या आहेत. कोहली हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधारही राहिला आहे. त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत.
२. राहुल द्रविड
२० जून १९९६ रोजी भारतीय संघाची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. द्रविड एकदा क्रीजवर स्थिरावला की त्याला बाद करणे कठीण मानले जायचे. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने टीम इंडियाला अनेक वेळा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. द्रविड टीम इंडियाचा कर्णधारही राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २५ पैकी ८ कसोटी सामने जिंकले आहेत. एक फलंदाज म्हणून त्याच्या नावावर १३२८८ कसोटी धावा आहेत.
३. सौरव गांगुली
सौरव गांगुलीने २० जून १९९६ रोजी इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने १३१ धावांची खेळी साकारली होती. पुढे तो टीम इंडियाचा कर्णधारही झाला. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया परदेशात जिंकायला शिकली. तो त्याच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जायचा. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २१ कसोटी सामने जिंकले. एक फलंदाज म्हणून त्याने टीम इंडियासाठी ११३ सामन्यात ७२१२ धावा केल्या आणि १६ शतके झळकावली. त्यानंतर सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्षही राहिला होता.