Virat Kohli Mental Health: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. टी २० विश्वचषकानंतर त्याला चांगली कामगिरी करण्यात सातत्याने अपयश आले आहे. तो सध्या अतिशय खराब फॉर्मशी झगडत आहे. शिवाय, त्याला अनेकदा विश्रांतीही देण्यात आली आहे. या सर्व कारणांमुळे त्याच्यावर काही माजी खेळाडूंनी टीका केली आहे. त्यामुळे तो क्रिकेटविश्वात सातत्याने चर्चेचा विषय ठरला आहे. आता विराट कोहली पुन्हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. विराटने मानसिक आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती उघड केली आहे.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत कोहलीने मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यावेळी स्वत:च्या मानसिक आरोग्याबाबत तो मोकळेपणाने बोलला. याशिवाय, युवा खेळाडूंनी चांगल्या मानसिक आरोग्यासाठी काय केले पाहिजे, यासाठी काही सल्लेही दिले.
कोहली म्हणाला, “खेळाच्या माध्यमातून एक खेळाडू स्वत:च्या सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणू शकतो. पण, असं करताना तुम्ही सतत दबावाखाली असता. त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. ही निश्चितच एक गंभीर समस्या आहे. आपण जितकं जास्त वेळ खंबीर राहण्याचा प्रयत्न करतो तितकंच आपलं मानसिक नुकसान होत असतं. त्यामुळं माझा नवीन खेळाडूंना सल्ला आहे की, त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीसह मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावं.”
प्रत्येक व्यक्तीचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे, असेही विराटने अधोरेखित केले. ही गोष्ट पटवून देताना त्याने स्वत:चे उदाहरण दिले. तो म्हणाला, “मलाही असे अनेक अनुभव आले आहेत. आवडत्या लोकांच्या सोबत असूनही मी एकटेपणा अनुभवला आहे. मला खात्री आहे, कधीना कधी असाच अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल. म्हणून, स्वत:साठी वेळ काढून स्वत:कडे लक्ष द्या.”
खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज आणि सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. आशिया चषकातून विराट कोहली जोरदार पुनरागमन करेल, अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.