भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून क्रीडाविश्वात रंगू लागल्या होत्या. मात्र, आज अखेर खुद्द विराट कोहलीनंच आपल्या ट्वीटर हँडलवर एक पत्रच पोस्ट करत आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून अनेकांनी चांगला निर्णय म्हणून त्याची पाठराखण केली आहे. दरम्यान, क्रिकेट समालोचक आणि समीक्षक हर्षा भोगले यांनी विराटच्या या निर्णयावर काहीसं आश्चर्य व्यक्त केलं आहे.

..तर दोन महिने ऑफ मिळाला असता!

विराट कोहलीच्या निर्णयानंतर हर्षा भोगले यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. “विराटची खेळाप्रतीची निष्ठा प्रचंड होती. मला वाटलं विराट कोहली आरसीबीचं (Royal Challengers Banglore) कर्णधारपद सोडेल. यामुळे त्याला किमान दोन महिने कॅप्टन्सीपासून सुट्टी मिळाली असती”, असं हर्षा भोगले आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

 

दरम्यान, असं सांगतानाच हर्षा भोगले यांनी त्याच्या उज्ज्वल भविष्याविषयी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. “मला आशा आहे की या निर्णयामुळे त्याला आवश्यक असणारा मानसिकदृष्ट्या आराम मिळेल. कुणास ठाऊक, यामुळे तो टी-२० फलंदाज म्हणून अजून मोठं यश मिळवेल”, असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

 

Virat Kohli Steps Down : टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार; ट्वीटरवर केलं जाहीर!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विराट कोहलीनं स्वत:च ट्वीट करून ही माहिती दिली आहे. विशेषत: आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या आधीच त्यानं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर विराटनं एक पत्रच ट्वीट केलं असून त्यामध्ये आपल्या निर्णयाविषयी त्यानं सविस्तर लिहिलं आहे. दरम्यान, आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचं विराटनं या पत्रात म्हटलं आहे. आपल्या पत्रामध्ये विराट कोहलीनं त्याला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले आहेत. रोहित शर्मा, रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं विराट कोहलीनं पत्रात म्हटलं आहे.

 

सगळ्यांशी चर्चा करूनच निर्णय

दरम्यान, सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचं विराट सांगतो. “अर्थात, या निर्णयापर्यंत येण्यासाठी बराच काळ लागला. माझ्या जवळच्या व्यक्तींशी, रवीभाई, रोहित यांच्याशी खूप सारी चर्चा केली आहे. त्यानंतर मी या निर्णयाप्रत आलो आहे की ऑक्टोबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर मी टी-२० संघाचा कर्णधार म्हणून पायउतार होणार आहे. माझ्या निर्णयाविषयी मी बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समितीच्या इतर सर्व सदस्यांसोबत बोललो आहे. भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा मी अशीच करत राहीन”, असं विराटनं या पत्राच्या शेवटी लिहिलं आहे.

Story img Loader