Virat Kohli swapped bails at the striker’s end before final ball : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळला जात आहे. केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर फक्त एक चेंडू टाकायचा बाकी असताना मैदानावर वाद पाहायला मिळाला. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या एका कृतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम संतापला. इतकंच नाही तर एडन मार्करम विराट कोहलीबद्दल पंचांकडे तक्रार करताना दिसला. काही क्षणातच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
कोहलीच्या या कृतीचा मार्करमला आला राग –
खरं तर, केपटाऊन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दिवसातील सर्व षटके वेळेवर पूर्ण होऊ शकली नाहीत, त्यानंतर पंचांनी खेळ अर्धा तास वाढवण्याचा निर्णय घेतला. केपटाऊन कसोटीचा पहिला दिवस संपायला अवघी काही मिनिटे बाकी असताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करमने वेळ वाया घालवायला सुरुवात केली. पहिल्या दिवसाचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी एडन मार्करम आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घेत होता, त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली नाराज दिसला. यानंतर विराट कोहलीने एडन मार्करमला धडा शिकवण्याची युक्ती खेळली. दिवसाचा शेवटचा चेंडू टाकायचा होता, तेव्हा विराट कोहली लगेच एडन मार्करमकडे गेला आणि स्टंपवरील बेल्स हलवून पुन्हा आहे तशा ठेवल्या.
एडन मार्कराम पंचांकडे तक्रार करताना दिसला –
यानंतर एडन मार्करम विराट कोहलीबद्दल पंचांकडे तक्रार करताना दिसला, ज्यामुळे कोहली आणि यष्टीरक्षक केएल राहुल दोघांनीही नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काही वेळातच कर्णधार रोहित शर्माने हस्तक्षेप करत गोलंदाज मुकेश कुमारशी चर्चा करण्यासाठी खेळ थांबवला. यानंतर मार्करमने मजबूत फॉरवर्ड-डिफेन्सिव्ह शॉटसह शेवटचा चेंडू प्रभावीपणे रोखण्यात यश मिळविले. केपटाऊन कसोटीचा पहिला दिवस संपल्यानंतर सर्व खेळाडू परतत असताना पंचांनी प्रथम रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहलीशी बोलले. हे दृश्य पाहून पंच विराट कोहलीला इशारा देत असल्याचे वाटत होते.
कोहलीला यापूर्वी मिळाले होते यश –
कोहलीने असे करण्यामागे एक खास कारण होते. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान डीन एल्गर आणि डी जॉर्जी यांच्यात दीर्घ भागीदारी झाली होती. भारताला विकेट्सची गरज होती, पण त्यांना यश मिळत नव्हते. त्यानंतर विराट कोहलीने स्टंपवरील बेल्स हलवल्या. अवघ्या दोन चेंडूंनंतर भारताला विकेट मिळाली. यामुळेच कोहलीला दुसऱ्या कसोटीतही ही युक्ती आजमावायची होती. कदाचित मार्करमला याचीच भीती वाटत असावी. म्हणून त्याने पंचाकडे याची तक्रार केली.