करोनाचे ओमिक्रॉन व्हेरिएंट संकट आणि भारतीय क्रिकेटमधील गोंधळाच्या दरम्यान टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. भारतीय संघाला येथे तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, त्यानंतर वनडे मालिका होणार आहे. दरम्यान, कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली, जो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, तो मस्करीच्या मूडमध्ये दिसला.

बीसीसीआयने भारतीय संघाचा एक व्हि़डिओ शेअर केला आहे. यात टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंची विमानातील झलक दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये विराट वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या बॅगेत डोकावू लागतो. बॅगेत हात घालताच विराटला अनेक गोष्टी मिळतात, जे पाहून तो थक्क होतो. तो म्हणतो, ”या व्यक्तीच्या बॅगेत सर्व काही आहे, चप्पल-चार्जर-शेकर सर्वकाही आहे, अशी बॅग मी प्रथमच पाहिली आहे, जो कोणी ही बॅग घेऊन जाईल तो जगात कुठेही धावू शकतो.”

हेही वाचा – PHOTOS : आफ्रिकेला पोहोचली विराटसेना..! उमेश यादवचा फोन पाहून लोक म्हणाले, “काय मस्त वाटतोय…”

यावर इशांत त्याला ”सकाळीच सकाळी अशी काम करू नकोस”, असे उत्तर देतो. विराटची इशांतसोबतची मस्ती आणि इशांतने त्याला दिलेले उत्तर तुम्हालाही हसण्यास भाग पाडेल. विराट कोहलीसाठी हा दौरा खूप खास असणार आहे. तो येथे आपला शंभरावा कसोटी सामना खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेत पोहोचण्यापूर्वी विराटला वनडे कर्णधारपदावरून वगळण्यात आले असून रोहित शर्माला भारताचा नवा वनडे कप्तान बनवण्यात आले आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे या कसोटी मालिकेचा भाग नसेल.

भारतीय संघ २६ डिसेंबरपासून जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. कसोटी मालिकेनंतर संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे.