विराट कोहलीने यापूर्वीच भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. टी-२० विश्वचषकानंतर तो कर्णधार असणार नाही, असे त्याने म्हटले होते. या स्पर्धेनंतर तो खेळाडू म्हणून संघात असेल. आता अजून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. विराट कोहलीलाही वनडे कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते.
स्पोर्ट्सकीडाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही मुक्त केले जाऊ शकते. काही दिवसांनी बीसीसीआयची बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय रोहित शर्माला टी-२० संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.
टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला भारतीय संघाचा नवा टी-२० कर्णधार बनवले जाऊ शकते. अद्याप अधिकृतपणे काहीही दुजोरा मिळालेला नसला, तरी या सर्व गोष्टी रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळतात. विराटने आयपीएलमधील आरसीबीचे कर्णधारपदही सोडले आहे.
हेही वाचा – खरं की काय..! अनुष्का शर्मानं घेतल्या ५ विकेट; BCCIच्या ‘त्या’ ट्वीटमुळं विराट होतोय ट्रोल
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीत अनेकदा पराभूत झाला आहे. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, २०१९ वर्ल्डकप सेमीफायनल आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीमला पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार म्हणून विराट कोहलीने आतापर्यंत कोणतेही आयसीसी विजेतेपद जिंकलेले नाही.
यूएईमध्ये सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने सुमार प्रदर्शन केले आहे. टीम इंडिया स्पर्धेबाहेर होण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा सामनाही गमावला. सर्वांचे लक्ष लागलेल्या पाकिस्तानविरुद्ध भारताला १० तर न्यूझीलंडविरुद्ध ८ गड्यांनी मात खावी लागली. फलंदाजी आणइ गोलंदाजी अशा दोन्ही विभागात भारताला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे विराटसेनेवर चहुबाजूंनी टीका होत आहे.