भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयला, दौऱ्यांमध्ये बायकोला संपूर्ण वेळ सोबत राहू देण्याची विनंती केली आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूची पत्नी परदेश दौऱ्यामध्ये केवळ दोन आठवडे सोबत राहू शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने हा मुद्दा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवला असून, यासंदर्भात क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना कल्पना देण्यात आलेली आहे.

विराटने केलेल्या विनंतीवरुन, क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय संघाचे सध्याचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना समितीकडे अधिकृतरित्या पत्र लिहण्याची मागणी केली आहे. मात्र यावर त्वरित निर्णय घेतला जाईल असे कोणतेही संकेत प्रशासकीय समितीने दिलेले नाहीयेत. बीसीसीआयच्या आगामी सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय चर्चेसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे.

विराटची पत्नी अनुष्का ही टीम इंडियाच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्याच्यासोबत असते. मात्र बीसीसीआयच्या नवीन नियमांप्रमाणे अनुष्काला आता विराटसोबत दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ राहता येणार नाही. याच कारणासाठी विराटने बीसीसीआयकडे नियमांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बीसीसीआय यावर काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader