भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सध्या सुरु असलेल्या विंडीजविरुद्धच्या मालिकेमधून विश्रांती देण्यात आलेली आहे. आगामी विश्वचषक लक्षात घेता बीसीसीआय पुढील मालिकांमध्ये प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार असल्याचंही समोर आलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे, भारतीय संघातल्या जलदगती गोलंदाजांना आयपीएलमधून वगळण्याची विनंती केल्याचं समजतंय. विशेषकरुन जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्याबद्दल कोहलीने ही मागणी केल्याची माहिती समोर येते आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट प्रशासकीय समितीच्या झालेल्या बैठकीत कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, प्रशिक्षक रवी शास्त्री, निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत विराटने ही मागणी केल्याचं कळतंय. 30 मे 2019 पासून इंग्लंडमध्ये विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाचं वेळापत्रक लक्षात घेऊन यंदा आयपीएलचं आयोजन हे मार्च महिन्यात करण्यात आलेलं आहे.
आगामी विश्वचषक लक्षात घेता संघातील प्रमुख खेळा़डूंना विश्रांती मिळणं गरजेचं असल्याचं कोहलीने स्पष्ट केलं. जर खेळाडू आयपीएलमध्ये खेळू इच्छित असतील तर त्यांना सुरुवातीचे 8-10 सामने व त्यानंतर संघाच्या गरजेनुसार खेळू देण्यात यावं अशी मागणीही विराटने केली आहे. यानंतर प्रत्येक खेळाडूला 15 नोव्हेंबरपर्यंत आगामी आयपीएल आपण खेळणार की नाही याबद्दल आपापल्या संघमालकांना कळवायचं आहे. मात्र खेळाडूंनी आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तर क्रिकेट प्रशासकीय समितीवर व बीसीसीआय कोहलीच्या विनंतीवर काम करु शकणार नाहीत, असं दिसत आहे.