भारतातील करोनाची स्थिती पाहता IPL 2020चे आयोजन युएईमध्ये करण्यात आले. आवश्यक त्या साऱ्या उपाययोजना केल्यानंतर अखेर IPLखेळणारे खेळाडू युएईमध्ये दाखल झाले. तेथे त्या खेळाडूंसाठी एक जैव-सुरक्षित वातावरणाचा बबल (फुगा) तयार करण्यात आला आहे. त्या बबलच्या आत गेल्यानंतर IPL संपेपर्यंत कोणालाही त्यातून बाहेर निघणे शक्य होणार नाही, असे BCCIने स्पष्ट केले आहे. केवळ खेळाडूच नव्हे तर संघमालकांना हा नियम लागू असणार आहे. अशा परिस्थितीत एका विराट कोहलीने एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

विराटने RCBच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक मुलाखत दिली. त्यात त्याने आपली रोखठोक मतं मांडली. “स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी जैव-सुरक्षित बबलचे नियम पाळणे गरजेचं आहे. खेळण्याची संधी मिळाली म्हणून आपण सारे येथे येऊ शकलो आहोत. भटकण्यासाठी किंवा मजा-मस्ती करण्यासाठी आपण येथे आलेलो नाही. सध्याच्या परिस्थितीत आपण युएईमध्ये हवं तिकडे फिरू शकत नाही. त्यामुळे साऱ्यांनी नियमांचं पालन करायला हवं आणि कोणत्याही अवाजवी अपेक्षा बाळगू नये”, असं विराटने स्पष्ट केलं.

“जैव सुरक्षित बबलमध्ये राहायला लागणं हे कोणासाठीही दडपण नसावं असं मला वाटतं. कारण करोनाचा फैलाव पाहता हे आवश्यक आहे. आपण सारे येथे क्रिकेट खेळायला आलो आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसराची आणि स्पर्धेची जबाबदारी आपल्यावर आहे. कोणताही खेळाडू नियमांचे उल्लंघन करत असेल, तर त्यामुळे त्याचं आणि संघाचं नाक कापलं जाणार आहे याची प्रत्येकाने नोंद घ्यायला हवी. एका खेळाडूच्या चुकीचे संघ आणि स्पर्धेचे नुकसान होऊ नये हे सध्या महत्त्वाचे आहे”, असेही कोहलीने नमूद केले.