भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा एका फिरकीपटूची शिकार ठरला आहे. नागपूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेतला पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली अवघ्या १२ धावांवर बाद झाला. या सामन्यात एका फिरकीपटूने विराटला बाद केलं. विराट सातत्याने फिरकीपटूसमोर निष्प्रभ ठरत असल्याचं आजच्या सामन्यातही पाहायला मिळालं. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते विराट एका साधारणर चेंडूवर बाद झाला.

नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा नवोदित खोळाडू टॉड मर्फीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. या नवख्या गोलंदाजाने विराटला आजच्या सामन्यात बाद केलं. मर्फीचा चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर जात होता, विराट कोहलीने तो चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू विराटच्या बॅटच्या कडेला स्पर्श करून थेठ यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीच्या हातात जाऊन विसावला.

सातत्याने फिरकीपटूंकडून विराटची शिकार

विराटची अलिकडच्या काळातली कसोटी क्रिकेटमधील फलंदाजी पाहता त्याच्या चाहत्यांसह क्रिकेट तज्ज्ञांना प्रश्न पडला आहे की, विराट सातत्याने फिरकीच्या जाळ्यात का अडकतोय? २०२१ पासून आतापर्यंत आशियाई मैदानांवर विराटने १६ डावांमध्ये फलंदाजी केली आहे. त्यापैकी १२ वेळा त्याला फिरकीपटूने बाद केलं आहे. त्याला ६ वेळा ऑफ स्पिनरने तर ६ वेळा लेग स्पिनरने तंबूचा रस्ता दाखवला आहे. सातत्याने फिरकीपटूकडून बाद होत असल्यामुळे विराटच्या क्रिकेट कौशल्यावर सवाल उपस्थित केला जात आहे.

नागपूर कसोटीवेळी समालोचन करणाऱे माजी भारतीय क्रिकेटपटू देखील यावर बराच वेळ चर्चा करत राहिले. समालोचकांच्या मते विराट सातत्याने बॅकफूटवर खेळण्याचा प्रयत्न करतोय, तसेच यादरम्यान त्याचं बॅटवरील नियंत्रण म्हणावं तसं दिसलेलं नाही. तो फिरकीपटूला सरळ रेषेत सामोरा गेला तर कदाचित तो बाद होणार नाही असा विश्वास समालोचकांना वाटतो.

हे ही वाचा >> ५ महिने कुबड्यांचा आधार घेतला, कमबॅकच्या पहिल्याच सामन्यात केला कांगारुंचा ‘पंच’नामा

विराटचा शतकांचा दुष्काळ

विराटने अलिकडच्या काही महिन्यांमध्ये टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शतक ठोकून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधला त्याचा फॉर्म सिद्ध केला आहे. परंतु कसोटी क्रिकेटमधला त्याचा शतकांचा दुष्काळ अद्याप संपलेला नाही. गेल्या दोन वर्षांमधील १७ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २६ च्या सरासरीने ७३० धावा जमवल्या आहेत. या काळात तो एकही शतक ठोकू शकला नाही. त्याने अखेरचं शतक २०१९ मध्ये फटकावलं होतं.

Story img Loader