Virat Kohli will not play in the first T20 match against Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ११ जानेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. यासंदर्भात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल द्रविडने चाहत्यांना मोठा धक्का दिला. राहुल द्रविडने सांगितले की, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात खेळणार नाही.
विराट कोहली बऱ्याच महिन्यांनी भारतीय टी-२० संघात परतला आहे, त्यामुळे चाहते खूप खुश होते, पण आता विराट कोहली पहिला सामना खेळणार नाही. या बातमीने चाहते थोडे निराश दिसत आहेत. राहुल द्रविडने विराट कोहली मोहाली येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले आहे. विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-२० सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशिक्षक म्हणाले. तो दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी उपलब्ध असेल. या मालिकेदरम्यान रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी टीम इंडियासाठी सलामी देताना दिसेल, असेही द्रविडने सांगितले.
विराटच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाचा समावेश होणार?
विराट कोहलीच्या पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर पडल्यानंतर आता कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूला संधी देणार हा मोठा प्रश्न आहे. रिपोर्ट्सनुसार, या यादीत संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांची नावे दिसत आहेत. या दोन्ही खेळाडूंचा या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापैकी एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – IND vs AFG 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना कधी आणि कुठे विनामूल्य पाहता येणार? जाणून घ्या
चाहत्यांना विराटसाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल –
विराट कोहली १४ महिन्यांनंतर टी-२० संघात परतला आहे. विराट कोहली शेवटचा टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये खेळताना दिसला होता. त्यानंतर चाहत्यांना विराट कोहलीची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामील होण्याची आतुरतेने वाट पाहत होते, पण आता चाहत्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता विराट कोहली टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.
हेही वाचा – Sandeep Lamichhane : बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्याने नेपाळच्या क्रिकेटपटूला आठ वर्षांची शिक्षा
पहिल्या सामन्यासाठी अशी असू शकते प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.