IND vs AFG, World Cup: विश्वचषक २०२३ स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारताने पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते. त्यानंतर आता भारतीय संघ या कुंभमेळ्यातील आपल्या दुसऱ्या सामन्यासाठीही सज्ज आहे. भारतीय संघ सोमवारी (दि. ०९ ऑक्टोबर) दिल्ली येथे पोहोचला आहे. येथील अरुण जेटली स्टेडिअमवर भारताला बुधवारी (दि. ११ ऑक्टोबर) अफगाणिस्तानचा सामना करायचा आहे. दरम्यान टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहली याने दिल्लीतील सामन्याबद्दल मोठे विधान केले आहे.
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या घरच्या मैदानावर, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दुसरा विश्वचषक सामना खेळण्यासाठी उत्सुक आहे. कोहली म्हणाला की, त्याच्या नावावर असलेल्या पॅव्हेलियनसमोर खेळणे हा क्षण नेहमीच खूप खास असतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या विश्वचषक २०२३च्या पहिल्या सामन्यात कोहलीने शानदार फलंदाजी करत ८५ धावा केल्या होत्या.
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये के.एल. राहुलने कोहलीला विचारले, “विराट हे तुझ्यासाठी घरवापसी आहे, आपण दिल्लीला जात आहोत. मला खात्री आहे की ही तुझ्यासाठी ही भावना खूप खास असणार आहे. तू लहानाचा मोठा तिथे झालास आणि आता तुझ्या नावाने ड्रेसिंग रूम आहे. आता तुझ्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत?”
राहुलच्या प्रश्नाला उत्तर देताना किंग कोहली म्हणाला, “जेव्हा तुम्ही त्या क्षणांकडे परत जाता, तेव्हा त्या आठवणी तुमच्या मनात नेहमी ताज्या असतात. तुम्हाला त्या आठवणी जाणवू शकतात कारण, तिथूनच सर्व काही सुरू झाले आहे. तिथूनच निवडकर्त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा संधी दिली, त्यामुळे तिथे जाणे नेहमीच खास असते. मी आता परत येईन आणि अरुण जेटली स्टेडियमवर खेळेन, हा क्षण खूप भावनिक आहे.”
विराट कोहली पुढे म्हणाला, “माझ्या नावाच्या पॅव्हेलियनसमोर मी स्वतः खेळणे हे थोडे विचित्र वाटत आहे. खरे सांगायचे तर, मला याबद्दल फारसे बोलणे आवडत नाही कारण ही एक अतिशय विचित्र भावना आहे परंतु, जेव्हा मी परत जातो आणि आता अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी पाहतो आणि मी कुठे सुरू केले होते हा विचार करतो, तेव्हा खूप कृतज्ञ वाटते.”
भारत-अफगाणिस्तान आमने-सामने
भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघ आतापर्यंत फक्त ३ वन डे सामन्यात आमने-सामने आले आहेत. यादरम्यान टीम इंडियाने दोन वेळा त्यांना पराभवाची धूळ चारली आहे. आता पुन्हा एकदा हा संघ एकमेकांविरुद्ध उतरणार आहेत. भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघातील पहिला सामना मार्च २०१४मध्ये खेळला गेला होता. मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ८ विकेट्सने विजय साकारला होता. त्यानंतर दुसरा सामना सप्टेंबर २०१८मध्ये खेळला गेला होता. मात्र, हा सामना बरोबरीत सुटलेला. पुढे दोन्ही संघातील अखेरचा वन डे सामना जून २०१९मध्ये खेळला गेला. हा सामना भारताने ११ धावांनी आपल्या नावावर केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघ २१३ धावांवर सर्वबाद झाला होता.
विश्वचषकातील कामगिरी
दुसरीकडे, विश्वचषकातील उभय संघाची कामगिरी पाहायची झाली, तर भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना केला होता. हा सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे, भारताचा स्टार सलामीवीर शुबमन गिल आजारी असल्याने त्याला या सामन्यात खेळता आले नव्हते. तसेच, तो अफगाणिस्तानविरुद्धही खेळताना दिसणार नाहीये. अशात इशान किशनला संधी मिळण्याची शकय्ता आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तानने आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. हा सामना बांगलादेशने ६ विकेट्सने जिंकला होता.
विश्वचषकासाठी उभय संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर
अफगाणिस्तान: हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी