भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहलीने टी-२० मधील कर्णधारपद सोडले असून त्यानंतर तो लवकरच या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने म्हटले. विराटने नुकतेच भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. टी-२० विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा होती. वर्ल्डकप हातात घेऊन विराटला गोड निरोप देता आला असता, पण सुपर १२च्या गटसाखळीतच भारताला गाशा गुंडाळावा लागला.

पाकिस्तानच्या जिओ न्यूज चॅनलवरील संवादादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुश्ताक अहमद म्हणाले, ”जेव्हा एखादा यशस्वी कर्णधार म्हणतो की त्याला कर्णधारपद सोडायचे आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक नाही. माझ्या मते भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये सध्या दोन गट आहेत. एक गट मुंबईचा तर एक गट दिल्लीचा आहे.”

”मला वाटते की विराट कोहली लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करेल. तरीही तो आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे. मला वाटते आता तो या फॉरमॅटमध्ये खेळला आहे. आयपीएलमुळेच यंदा टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाची कामगिरी सुमार राहिली. भारताचे खेळाडू बराच काळ बायो-बबलमध्ये आहेत. विश्वचषकाच्या पूर्वीपासून ते बायो बबलमध्ये असून त्यामुळे त्यांना थकवा आल्यासारखे झाले असावे आणि ज्याचा परिणाम खेळावर झाला”, असेही मुश्ताकने म्हटले.

हेही वाचा – PTVचा अख्तरवर १० कोटींचा मानहानीचा दावा; प्रत्युत्तरात शोएब म्हणाला, “माझे वकील सलमान खान…”

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने नामिबियाविरुद्ध नऊ गडी राखून शानदार विजय नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना निरोप देण्यात आला. आयसीसीच्या स्पर्धेसोबत रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून करार संपला.

टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघातील जवळपास सर्वच खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा थकलेले होते. त्याशिवाय ‘आयपीएल’ आणि विश्वचषकामध्ये अवघ्या दोन दिवसांचा फरक भारताच्या सुमार कामगिरीसाठी कारणीभूत ठरला, असे स्पष्ट मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

Story img Loader