Virat Kohli 15th Clean Bowled in his Test career : भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातही भारतीय संघ बंगळुरु येथील सामन्याप्रमाणे अडचणीत सापडला आहे. शानदार गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडला २५९ धावांवर रोखल्यानंतर भारताची फलंदाजी पुन्हा अपयशी ठरली. विशेष म्हणजे संघाचे स्टार फलंदाज विराट-रोहित सपशेल अपयशी ठरले आहेत. साऊदीने रोहितचा (०) तर सँटनरने विराटचा (१) त्रिफळा उडवला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुण्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दिवशी भारतीय संघाला सकाळच्या सत्रात शुबमन-विराट बाद झाल्या दोन मोठे धक्क बसले आहेत. विशेष म्हणजे भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मिचेल सँटनरने फुलटॉस बॉलवर क्लीन बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला. विराट कोहली अशा प्रकारे बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण कोहली डावाच्या सुरुवातीला खूपच सावधपणे खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याला ९ चेंडूत फक्त एकच धाव करता आली. अशा प्रकारे भारतीय संघाला २४.४ षटकांत ५६ धावांवर मोठा धक्क बसला.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली बाद होताच एक असा आकडा समोर आला, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक काळ असा होता की कोहलीने फिरकी गोलंदाजांविरुद्ध निर्भयपणे खेळून भरपूर धावा केल्या. २०१६-१७मध्ये, त्याने घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आणि पुण्यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावले. मात्र, २०२१ पासून तो फिरकीपटूंविरुद्ध शरणागती पत्करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या १५ पैकी ९ वेळा त्याला फिरकी गोलंदाजांनी क्लीन बोल्ड केले आहे. ही विराट कोहलीसाठी चिंतेची बाब आहे.

आशिया कप २०२१ पासून विराट कोहली फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करताना दिसत आहे. या काळात तो २६ डावांपैकी २१ वेळा फिरकी गोलंदाजांचा बळी ठरला आहे. दरम्यान, त्याची सरासरी केवळ २८.८५ इतकी आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज कोहलीसाठी सर्वात वाईट कामगिरी करत आहेत. परिस्थिती अशी आहे की २०२१ च्या आशिया कपपासून तो डावखुरा स्पिनरच्या चेंडूवर १० वेळा बाद झाला आहे आणि त्याची सरासरी २७.१० आहे.

हेही वाचा – Washington Sundar : ‘आजचा दिवस कधीही विसरु शकणार नाही कारण…’, शानदार गोलंदाजीनंतर वॉशिंग्टन सुंदरने ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय

विराट कोहली आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत बाद होण्याचे प्रकार :

  • डाव- १९८
  • नाबाद-१२
  • झेलबाद-१२६
  • त्रिफळाचीत-१५
  • पायचीत-४०
  • धावबाद-३
  • यष्टीचीत-१
  • स्वयंचीत-१

पुणे कसोटीत भारत अडचणीत आहे

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताची स्थिती अत्यंत नाजूक आहे. दुसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच टीम इंडियाचे ६ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले असून धावसंख्याही १०० चा टप्पा ओलांडू शकलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडताच बाद झाला, शुबमन गिल ३० धावा करून परतला . कोहली एका धावसंख्येवर बाद झाला. गेल्या सामन्यातील दोन नायक ऋषभ पंत आणि सर्फराझ खान यांनाही पहिल्या डावात चांगली कामगिरी करता आली नाही आणि ते लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले.