Virat Kohli’s new hairstyle A photo Viral: आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका संघात खेळली जाणार आहे. या स्पर्धेचा प्रबळ दावेदार टीम इंडिया मानले जात आहे. टीम इंडियाला हा चषक जिंकायचा असेल, तर स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट तळपणे महत्त्वाचे आहे. याआधी रनमशीन विराट कोहलीच्या नवीन लूकची एक झलक समोर आली आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक २०२३ पूर्वी एका नव्या लूकमध्ये दिसला आहे. आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. त्याचवेळी टीम इंडिया २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. किंग कोहलीने मेगा मॅचच्या आधी एक नवीन लूकची झलक शेअर केली आहे.
विराट कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवच्या एका स्टोरीद्वारे त्याच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे. कोहलीची ही नवीन शैली अप्रतिम दिसते. कोहलीची दाढी नव्या लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे. सध्या विराट कोहली टीम इंडियासोबत आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. भारतीय संघ आशिया कपचे सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.यापूर्वी २०२२ मध्ये खेळलेला आशिया चषक विराट कोहलीसाठी खूप खास राहिला होता, ज्यामध्ये त्याने जवळपास तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. जे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० मधील पहिले शतक होते. आशिया कपमधील या शतकानंतर कोहलीने पुन्हा एकदा लय पकडली आणि शानदार कामगिरी केली.
वेस्ट इंडिज दौऱ्यात झळकावले होते शतक –
अलीकडेच टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता, जिथे तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळली गेली. येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने शतक झळकावले होते. कोहलीने ज्या सामन्यात शतक झळकावले, तो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५०० वा सामना होता, ज्यात त्याने पहिल्या डावात ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावा केल्या होत्या. हे त्याचे ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले.
हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाने लॉन्च केली नवीन जर्सी, पीसीबीने शेअर केला खास VIDEO
भारतासाठी खेळले ५०१ आंतरराष्ट्रीय सामने –
विशेष म्हणजे विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ५०१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांत त्याने ५३.६३ च्या सरासरीने २५५८२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ७६ शतके आणि १३१ अर्धशतके झळकावली आहेत.