टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने गेल्या काही महिन्यांत बरेच चढ-उतार पाहिले आहेत. आरसीबी आणि टीम इंडियाचे टी-२० कर्णधारपद सोडल्यानंतर त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले आहे, मात्र या कठीण परिस्थितीतही त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ट्विटर इंडियाने अधिकृतपणे जाहीर केले आहे, की विराट कोहलीचे एक ट्वीट या वर्षातील सर्वात जास्त लाइक केलेले ट्वीट आहे.
विराट कोहलीने या वर्षी ११ जानेवारी रोजी आपली मुलगी वामिकाच्या जन्माची माहिती ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना दिली आणि वर्षाच्या अखेरीस त्याचे ट्वीट २०२१ या वर्षातील सर्वाधिक लाइक केलेले ट्वीट बनले आहे. सध्या सुमारे ५ लाख ४० हजार लोकांनी या ट्वीटला लाइक केले आहे, तर सुमारे ६० हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केले आहे.
विराट कोहलीने या ट्वीटमध्ये दोन फोटो अपलोड केले आहेत, ज्यामध्ये त्याने मुलगी वामिकाच्या जन्माची माहिती दिली आणि लिहिले, “आम्हा दोघांना आज दुपारी मुलगी झाल्याचे कळवताना आनंद होत आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि मुलगी दोघीही ठीक आहेत आणि आम्ही भाग्यवान आहोत, की आम्हाला या जीवनाचा हा अध्याय अनुभवायला मिळाला. आम्हाला माहीत आहे, की या क्षणी आम्हाला गोपनीयतेची आवश्यकता आहे.”
हेही वाच – विषयच संपला..! गांगुलीनं सांगितलं विराटच्या हकालपट्टीचं ‘खरं’ कारण; रोहितबाबत म्हणाला, ‘‘आमचा…”
ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सचे एक ट्वीट भारतात सर्वाधिक रिट्वीट झाले आहे. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात, पॅट कमिन्सने करोनाग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यासाठी त्यांनी पीएम केअर फंडला ५० हजार डॉलर्सची रक्कम दिली. या वर्षात सर्वाधिक रिट्वीट झालेल्या ट्वीटद्वारे त्याने ही माहिती दिली. कमिन्सचे हे ट्वीट जवळपास १ लाख ३६ लोकांनी रिट्वीट केले आहे.