भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने विराट कोहलीने फंलदाजीत राखलेल्या सातत्याचं कौतूक केलं आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात निर्णायक 104 धावांची खेळी केली. भारताने सहा गडी राखत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. 299 धावांचा पाठलाग करताना विराटने एकदिवसीय कारकिर्दीतील 39 वं शतक ठोकलं. दरम्यान मोहम्मद अझरुद्दीनने विराट कोहलीचा फिटनेस असाच कायम राहिला तर तो 100 शतकं ठोकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘विराट कोहलीच्या खेळातील सातत्य कमालीचं आहे. जर तो फिट राहिला तर 100 शतकं ठोकण्याचा पराक्रम करेल. जिथे खेळातील सातत्याचा प्रश्न येतो तिथे कोहली अनेक महान खेळांडूनाही मागे टाकतो. तो एक महान खेळाडू आहे. जेव्हा कधी तो शतक ठोकतो तेव्हा फार कमी वेळा भारताचा पराभव होतो’, असं मोहम्मद अझरुद्दीनने म्हटलं आहे. यावेळी अझरुद्दीनने धोनीच्या विजयी खेळीचं कौतूक केलं.

‘तुम्ही नीट पाहिलंत तर जेव्हा कधी भारताचे वरच्या फळीतील तीन फलंदाज धावा करतात आपण सामना जिंकतो. दुर्दैवाने गेल्या सामन्यात आपण तीन विकेट मागोमाग गमावल्या होत्या. रोहित शर्माने शतक करुनही आपला पराभव झाला. पण दुसऱ्या सामन्यात विराटने आणि धोनीनेदेखील अत्यंत चांगली खेळी केली. धोनी शेवटी थकला होता पण त्याने विकेट गमावला नाही. दिनेश कार्तिकनेही चांगली फलंदाजी केली. एकंदरीत पाहता भारताची कामगिरी चांगली होती’, असं मोहम्मद अझरुद्दीनने सांगितलं आहे.

‘जेव्हा तुम्ही सराव करत नाही आणि स्थानिक क्रिकेटपासून दूर असता तेव्हा आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकणं कठीण होऊन जातं. यामुळे धोनीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात धीम्या गतीने खेळी केली पण दुसऱ्या सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली’, असं मोहम्मद अझरुद्दीनने म्हटलं आहे.

Story img Loader