भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट शांतपणे पार पडली जाईल या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. एक मालिका आणि वादाचा मुद्दा हे समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये पक्कं झालेलं आहे. मग तो वादाचा मुद्दा छोटा असो किंवा मोठा….विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशवर घरच्या मैदानात कसोटी मालिकेत २-० आणि टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारली. कोलकाता कसोटी सामन्यात विजयानंतर कर्णधार विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचं कौतुक केलं. दादाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००० सालापासून ही विजयाची मालिका सुरु केली, आणि तीच आम्ही पुढे नेत आहोत. विराट कोहलीने अशा आशयाचं वक्तव्य केल्यानंतर माजी कर्णधार सुनिल गावसकर थोडेसे भडकले. “सौरव सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे म्हणून कोहलीला त्याच्याबद्दल चांगलं बोलावं लागत आहे. मात्र ७०-८० च्या दशकातही भारतीय संघ जिंकत होता, विराटचा त्यावेळीही जन्मदेखील झाला नव्हता”, असं म्हणत गावसकरांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली.

आता साहजिकच या वादानंतर क्रिकेटमधली जुनी-जाणती मंडळी गावसकरांची बाजू घेऊन विराटला उपदेशाचे डोस पाजत आहेत. असं करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मात्र हे सर्व प्रकरण म्हणजे पराचा कावळा केल्यासारखं आहे. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक कर्णधाराला आणि खेळाडूला असं वाटत असतं की आमच्या काळातली टीम ही अधिक चांगली होती, आम्हीदेखील परदेशात प्रतिस्पर्ध्यांना हरवलं आहे. पण हा पिढ्या-पिढ्यांमधला फरक असल्याची साधी गोष्ट आपल्या कोणाच्याही लक्षात येऊ नये. सुनिल गावसकर हे भारतीय क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक खेळाडू आहेत, यात कोणतीही शंका नाही. पण काळ आता बदलला आहे, जशी प्रत्येक खेळात स्थित्यंतर होतात तशीच क्रिकेटमध्येही झाली आहेत. सध्या सोशल मीडियावर ‘Gona tell my Kids’ असा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे ९० च्या दशकानंतर जन्माला आलेल्या पिढीसाठी आजही सौरव गांगुली हाच भारताचा सर्वात आक्रमक आणि यशस्वी कर्णधार आहे. साहजिकजच ते चर्चा करताना त्याचेच किंवा त्याच्या संघातील खेळाडूंचेच दाखले देणार. पण याचा अर्थ, गावसकर आणि त्यांचा संघ खराब कामगिरी करत होता, विराटला भारतीय क्रिकेटचा इतिहासच माहिती नाही असा काढणं म्हणजे उगाच वाद करत राहिल्यासारखं आहे.

आता एकदम साधी गोष्ट आहे, ८३ साली कपिल देवच्या भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. पण हा प्रसंग माझ्या पिढीने कधी अनुभवला नाही. आम्ही हे क्षण टीव्हीवर हायलाईट्स अनुभवले आहेत. मात्र धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २००७ आणि २०११ साली विश्वचषक जिंकला, हा थरार आम्ही अनुभवला आहे. त्यामुळे साहजिकच आम्ही दाखले देताना धोनी आणि त्याच्या संघाच्या खेळाचे दाखले देणार, याचा अर्थ धोनीच्या आधी भारतीय संघ चांगली कामगिरी करतच नव्हता असा अजिबात नाही. जितकं महत्व धोनीचं तितकच किंवा त्याच्यापेक्षा जास्त कपिल देव यांचं….कारण देशाला पहिला विश्वचषक त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे. गोष्टी इतक्या साध्या आणि सोप्या असताना, आपल्याकडे लोकांना वाद घालत राहणं का आवडतं हेच कधी कळत नाही.

आता गावसकरांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यासाठी इतिहासाचे अनेक दाखले देता येतील. पतौडींच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमधला विजय, ७१ सालात वाडेकरांच्या भारतीय संघाने विंडीज आणि इंग्लंडला त्यांच्याच देशात दिलेला धोबीपछाड इ.इ….पण विराटने गांगुलीचं कौतुक केल्यानंतर त्याला उपदेशाचे डोस पाजताना सर्वजण एक गोष्ट विसरतात ती म्हणजे, खडतर प्रसंगात गांगुलीकडे आलेलं भारतीय संघाचे कर्णधारपद. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे काही वर्षांपूर्वी टीम इंडियाची प्रतिमा डागाळलेली होती. मला अजुनही तो काळ आठवतोय की ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना असला की घरी बाबा म्हणायचे, अरे कशाला एवढं उत्साहीत होतोयस?? ऑस्ट्रेलिया आहे ती, हरणार आपण आज, आणि भारत हरायचाच. परदेशातही अशीच काहीशी परिस्थिती व्हायची. अशा निराशेच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय संघाला वर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सौरव गांगुलीनेच.

अगदीच आकडेवारी द्यायचं म्हटलं तर ४९ पैकी २१ कसोटी सामन्यात कर्णधार या नात्याने विजय, परदेशात सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार असे अनेक दाखले देता येतील. यामध्ये गांगुलीचे कित्येक विक्रम काही महिन्यांपूर्वी खुद्द विराटनेच मोडले आहेत. याचा अर्थ विराट आताच गांगुलीपेक्षा यशस्वी कर्णधार आहे असं म्हणणंही घातक ठरेल, पण आपण आदर्श मानत असलेल्या खेळाडूची जाण ठेऊन उल्लेख करणं इतकाच काय तो विराटच्या वक्तव्यमागचा अर्थ काढता येईल. पण विराटने गांगुलीचं कौतुक केलं म्हणजे त्याला भारतीय क्रिकेटचा इतिहासचं माहिती नाही असा अर्थ काढणं म्हणजे सुतावरुन स्वर्ग गाठणं नव्हे का??

सामने हे नुसते मैदानावरच जिंकले जात नाहीत, कर्णधार म्हणून तुमची समोरच्या संघाला धास्ती वाटायला हवी. माझ्या पिढीसाठी भारताची अशी छबी निर्माण करणारा खेळाडू म्हणजे सौरव गांगुली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेकीसाठी समोरच्या कर्णधाराला ताटकळत ठेवणं, लॉर्ड्सच्या गॅलरीत टी-शर्ट काढून केलेलं भन्नाट सेलिब्रेशन हे सर्व द्योतक होतं की भारतीय क्रिकेट आता आक्रमक झालेलं आहे, ते कोणाच्याही हाताखाली दबून राहणार नाही. भले या सर्व गोष्टी काही लोकांना आवडणार नाहीत, मात्र विराट कोहली हा देखील गांगुलीसारखाच एक आक्रमक कर्णधार आहे. साहजिकच आहे त्याचा जन्म झालेला नव्हता तेव्हा भारतीय संघ कसा भारी खेळत होता हे त्याला कदाचीत माहिती नसेल, पण भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दादा’ बनवणाऱ्या माणसाला त्याने समोर पाहिलंय. मग एका प्रसंगात त्याचा उल्लेख केल्याने बिघडलं कुठे??

क्रिकेट हे बदलत जाणार, जसं मी वर नमूद केलं त्याप्रमाणे हा पिढ्यांमधला फरक आहे. सध्याची पिढी ही विराट कोहलीची आहे. त्या पिढीला पतौडी-कपिल देव-वाडेकर-गावसकर यांसारखे खेळाडू कदाचीत रुचणार नाहीत, पण याचा अर्थ ते पटणार नाहीत असा होता नाही. गोष्टी कुठपर्यंत ताणायच्या, हे अखेरीस प्रत्येकाच्या हातात आहे.

  • आपल्या प्रतिक्रिया prathmesh.dixit@indianexpress.com वर पाठवा

Story img Loader