आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता आणि तहसीलदार वीरधवल खाडे कोलकाता येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेपासून पुनरागमन करणार आहे. वीरधवलसह देशातील अव्वल जलतरणपटू या स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध करणार आहेत.
२३ वर्षांपासून सांघिक जेतेपदाची कमाई करणारा कर्नाटकचा संघ यंदा कमकुवत झाला आहे. जेतेपदासाठी त्यांना रेल्वे, महाराष्ट्र, सेनादलाकडून कडवी टक्कर मिळू शकते.
२०१० साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या वीरधवलने इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र त्याच्या अनुपस्थितीत संदीप शेजवळने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले होते. संदीप रेल्वेचे प्रतिनिधित्व करणार आहे तर ५० ते ४०० मीटर अशा सर्व प्रकारात राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या वीरधवलकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.
पुढील वर्षी रशिया येथे होणाऱ्या जागतिक जलतरण संघटनेच्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता फेरी म्हणून या स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य़ धरली जाणार आहे. रशियातील स्पर्धेद्वारेच रिओ ऑलिम्पिकचा मार्ग स्पष्ट होणार असल्याने वीरधवलला या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करणे आवश्यक आहे.
दरम्यान प्रतिबंधित उत्तेजकांच्या सेवनप्रकरणी दोषी आढळल्यामुळे दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा झालेली रिचा मिश्रा या स्पर्धेद्वारे पुनरामगन करणार आहे. युवा खेळाडूंमध्ये साजन प्रकाश, मधू पी.एस, सौरभ संगवेकर, दामिनी गौडा आणि मीना पटेल यांना कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ आहे.
वीरधवल पुनरागमनासाठी सज्ज
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता आणि तहसीलदार वीरधवल खाडे कोलकाता येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेपासून पुनरागमन करणार आहे.
First published on: 12-11-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virdhawal khade set for comeback at nationals