दुबई : भारताच्या माजी कर्णधार डायना एडुल्जी, वीरेंदर सेहवाग आणि श्रीलंकेचा अरिवद डिसिल्व्हा यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वतीने ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये केलेल्या देदीप्यमान कामगिरीसाठी या तिघांचा सन्मान करण्यात आला आहे. असा सन्मान मिळवणारी डायना एडुल्जी या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. भारतीय महिला संघाचे नेतृत्व करताना एडुल्जी यांनी खेळाडू म्हणूनही आपला प्रभाव पाडला होता. निवृत्तीनंतर एडुल्जी या एक उत्तम क्रिकेट प्रशासक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
‘‘आयसीसी’च्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश होण्याचा मान हा मी बहुमान समजते. हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्याचाही मला अभिमान आहे,’’ अशी प्रतिक्रिया एडुल्जी यांनी दिली. एडुल्जी यांनी १९७६ ते १९९३ या कालावधीत ५४ सामने खेळले. यातील २० कसोटी सामने होते. यामध्ये ४०४ धावा व ६३ गडी एडुल्जी यांनी बाद केले आहेत. एडुल्जी यांनी ३४ एकदिवसीय सामने खेळताना २११ धावा व ४६ गडी बाद केले आहेत.
सेहवागने कारकीर्दीत २३ कसोटी शतके झळकावली असून, यात ३१९ ही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याची सर्वोत्तम खेळी आहे. सेहवागने १०४ कसोटी सामन्यात ८,५८६ धावा केल्या असून, ४० गडीही बाद केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेहवागने ८,२७३ धावा केल्या आहे. सेहवागने २५१ सामन्यात ९६ गडीही बाद केले आहेत. श्रीलंकेच्या फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणून अरिवद डिसिल्व्हाची ओळख होती. विश्वकरंडक विजेतेपदात डिसिल्व्हाच्या फलंदाजीचा मोठा वाटा होता.