Virender Sehwag and Gautam Gambhir react after West Indies disqualification: वेस्ट इंडिज क्रिकेट संघ प्रथमच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत विंडीजला पराभव झाला. वेस्ट इंडिजला सुपर सिक्समध्ये स्कॉटलंडविरुद्ध ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. यामुळे वेस्ट इंडिजचा संघ आता या वर्षअखेरीस भारतात होणाऱ्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिज संघाच्या या खराब कामगिरीवर भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने निशाणा साधला आहे.

फक्त एक दिलासादायक बाब आहे – वीरेंद्र सेहवाग

वेस्ट इंडिज संघाच्या बाहेर पडल्यानंतर वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, “वेस्ट इंडिजचा संघ आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. यावरून हे स्पष्ट होते की केवळ टॅलेंट असून काम चालत नाही, तर राजकारणापासून मुक्त मॅनेजमेंटवर काम करण्याची गरज आहे. फक्त एक दिलासादायक बाब आहे ती म्हणजे येथून अजून खाली जाण्याचा कोणताही मार्ग नाही.”

वेस्ट इंडिज संघ अजूनही जागतिक क्रिकेटमध्ये नंबर एक बनू शकतो – गौतम गंभीर

भारतीय संघाचा आणखी एक माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने देखील ट्विट केले. त्याने वेस्ट इंडिजबद्दल सांत्वन करताना आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मला वेस्ट इंडिज आवडते, मला वेस्ट इंडिज क्रिकेट आवडते, मला विश्वास आहे की तो अजूनही जागतिक क्रिकेटमध्ये नंबर एक बनू शकतो.”

हेही वाचा – ENG vs AUS: केविन पीटरसनवर नॅथन लायन संतापला; फिलिप ह्युजेसची आठवण करुन देताना म्हणाला, ‘मी…’

स्कॉटलंडविरुद्ध वेस्ट इंडिज संघ अवघ्या १८१ धावांवर गारद झाला –

एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडिज संघाची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात संघ ४३.५ षटकांत केवळ १८१ धावांवर गारद झाला. याआधी नेदरलँड आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यांमध्येही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आयसीसीची ही तिसरी स्पर्धा आहे, ज्यात वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरू शकला नाही. यापूर्वी २०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर २०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेत विंडीजचा संघ पात्र ठरू शकला नव्हता.