Virender Sehwag Divorce rumours with Aarti Ahlawat : भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो, कधी आपल्या हटक्या ट्वीटने तर कधी आपल्या रोखठोक भूमिकेसाठा चर्चेत असतो. पण सध्या तो आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. वीरेंद्र सेहवाग लग्नाच्या २० वर्षांनंतर पत्नी आरती अहलावतपासून विभक्त होत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती कोणीही दिलेली नाही. ही सर्व चर्चा सेहवाग आणि त्याच्या पत्नीने एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याने सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा का होतेय?

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, कुटुंबातील जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, दोघे अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत आणि घटस्फोटाची शक्यता आहे. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागने २००४ साली लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. आर्यवीर सेहवागचा जन्म २००७ मध्ये झाला आणि वेदांत सेहवागचा जन्म २०१० मध्ये झाला. ही दोन्ही मुले आता किशोरवयीन आहेत. आता सेहवाग आणि आरतीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. या परिस्थितीत त्यांच्या नात्यात दरार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

सेहवाने शेवटचा कोणता फोटो पोस्ट केला होता?

जर तुम्ही इन्स्टाग्रामवर वीरेंद्र सेहवागला फॉलो करत असाल, तर तुमच्या लक्षात आले असेल की वीरेंद्र सेहवागने त्याच्या कुटुंबाचा पोस्ट केलेला शेवटचा फोटो २०२४ च्या दिवाळीत होता. त्या फोटोंमध्ये सेहवाग व्यतिरिक्त त्याचा मुलगा आणि आई दिसली, पण पत्नी आरती अहलावत दिसली नाही. अशा परिस्थितीत या जोडप्याची दीर्घकाळापासून सुरु असलेला संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याचे समजते.

याप्रकरणी सेहवागनेही मौन बाळगले आहे. अशा परिस्थितीत आरती आणि सेहवाग यांच्यातील विभक्त होण्याच्या अफवांना आणखी वेग आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी वीरेंद्र सेहवागने पलक्कड येथील विश्व नागयाक्षी मंदिराला भेट दिली होती. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्यांच्यामध्ये आरती कुठेच दिसत नव्हती. हे देखील त्यांच्या नात्यातील दरी दर्शवते. याबाबत सेहवाग किंवा आरती अहलावत यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेले नाही.

कोण आहे आरती अहलावत?

नवी दिल्लीतील रहिवासी असलेल्या आरती अहलावतने आपली ओळख बहुतेक वेळा सामान्य माणूस म्हणून ठेवली आहे. १६ डिसेंबर १९८० रोजी जन्मलेल्या आरतीने लेडी इर्विन माध्यमिक विद्यालय आणि भारतीय विद्या भवनमधून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या मैत्रेयी कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये डिप्लोमा केला. सेहवाग आणि तिची प्रेम कहानी २००० च्या आसपास सुरु झाली. त्यानंतर २००४ मध्ये, दोघांनी माजी अर्थमंत्री आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणजेच डीडीसीए, अरुण जेटली यांच्या निवासस्थानी लग्न केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag and wife aarti unfollow each other on instagram amid divorce rumours vbm