भारतीय संघाचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा काय कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतो. सेहवागला त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी जसं ओळखलं जातं तसंच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखलं जातं. क्रिकेटसह इतर क्षेत्रातल्या घडामोडींवरही सेहवाग भाष्य करत असतो. आता मात्र वीरूला लोक चांगलेच ट्रोल करत आहेत. याचं कारण ठरलं आहे त्याने घातलेला अरबी पोशाख.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निमित्त होतं ते दुबईतल्या ILT20 फायनल स्पर्धेचं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हे समालोचन करत होते. यावेळी वीरेंद्र सेहवाग आणि शोएब अख्तर या दोघांनीही अरबी पेहराव केला होता. या पेहरावावरुन वीरेंद्र सेहवागला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. एवढंच काय शोएब आणि वीरूचा फोटो चांगलाच व्हायरलही झाला आहे.

हे पण वाचा- David Warner: माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने डेव्हिड वॉर्नरचे केले कौतुक; म्हणाला, “वाकाच्या खेळपट्टीवर केलेले शतक…”

अरबी लूकवरून वीरेंद्र सेहवागची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

ILT20 अंतिम सामन्याच्या समालोचनासाठी वीरेंद्र सेहवाग दुबईला गेला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर एमआय एमिरेट्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात त्याने समालोचन केले. यावेळी त्याच्यासोबत पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज शोएब अख्तरही दिसला. यावेळी समालोचन करताना दोघंही अरबी लूकमध्ये दिसले. त्यांनी ‘जुब्बा’ घातला होता, जो इस्लामिक देशांमध्ये लोकप्रिय आहे. जो आयोजकांनी त्यांना सामना सुरू होण्यापूर्वी घालायला लावला होता.

सेहवागच्या या लूकवरून त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण’ अशी वीरेंद्र सेहवागची गत झाली आहे असं नेटकरी म्हणत आहेत. कारण भारतीय संस्कृती, देशप्रेम, राष्ट्रवाद याविषयी कायम लोकांना बोलणारा, त्यांना ज्ञानामृत पाजणारा सेहवाग अरबी लूकमध्ये दिसला. मागील काही काळापूर्वी सेहवागने टीम इंडियाऐवजी ‘टीम भारत’ यासाठी आग्रह धरला होता. यावरून तो प्रसिद्धीच्या झोतात आला मात्र आता त्याला अरबी पेहरावामुळे टीकाकारांचा सामना करावा लागत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag arab look from ilt20 final draws hilarious reactions scj