Virender Sehwag as BCCI for chief selector: टीम इंडिया बद्दल गुप्त माहिती उघड केल्याच्या आरोपामुळे चेतन शर्माने राष्ट्रीय निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चार महिन्यांनी बीसीसीआयने अधिकृतपणे रिक्त जागेचा शोध सुरू केला आहे. एक मोठे नाव स्पॉटसाठी स्पर्धक म्हणून समोर आले होते ते म्हणजे, वीरेंद्र सेहवाग. मागील काही काळात या पदासाठी लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर तसेच, युवराज सिंग आणि हरभजन सिंग अशीही मोठी नावे समोर आली होती. परंतु निवृत्तीच्या वर्षांच्या निकषामुळे कोणीही पात्र ठरले नाही. फक्त सेहवागच या दोन्ही निकषांना पूर्ण करत असल्याने बोर्डाने त्याच्याशी संपर्क साधला आहे अशी चर्चा होती. याबाबत आता स्वतः वीरेंद्र सेहवागने उत्तर दिले आहे
चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर, शिव सुंदर दास यांना समितीचे अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या समितीमध्ये एस शरथ (दक्षिण), सुब्रतो बॅनर्जी (मध्य) आणि सलील अंकोला (पश्चिम) यांचा समावेश आहे. गुरुवारी, बीसीसीआयने उत्तर विभागीय पदासाठी निवडलेल्या उमेदवारासह नवीन मुख्य निवडकर्ता म्हणूनही अर्ज मागवले आहेत. यासाठी उमेदवाराने सक्रिय क्रिकेटमधून पाच वर्षांपासून निवृत्ती घेतलेली असावी व कारकिर्दीत सात कसोटी किंवा १० एकदिवसीय सामने किंवा किमान ३० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला याविषयी माहिती देताना सेहवागने यावर स्पष्ट ‘नाही’ असे उत्तर दिले आहे. या पदस्तही तब्बल १ कोटींचे पॅकेज जरी असले तरी सेहवाग स्वतः सध्या विविध प्लॅटफॉर्मवर विश्लेषक म्हणून काम करतो, प्रमोशनल अॅक्टिव्हिटींमधून भरघोस रक्कम कमावतो. तसेच यापूर्वी वीरेंद्र सेहवागला मुख्य प्रशिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितले गेले होते आणि नंतर ते पद अनिल कुंबळेकडे गेले. त्यामुळे तो स्वत: अर्ज करेल अशी शक्यता नाही असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले आहे.