नेरूळच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या १०व्या डॉ.डी.वाय.पाटील टी-२० स्पर्धेच्या सामन्यात कॅग संघाकडून खेळताना विरेंद्र सेहवागने मुंबई कस्टम संघाविरुद्ध अवघ्या २० चेंडूत ४८ धावा ठोकल्या.
डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमी मार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. फलंदाजी करताना वीरूने पहिल्याच षटकात १५ धावा ठोकल्या. त्यानंतर तीसऱया षटकात आणखी आक्रमक खेळी करत १८ धावा ठोकल्या. अशाप्रकारे कॅग संघाची धावसंख्या पहिल्या चार षटकांमध्येच ४८ पर्यंत पोहोचली. त्यानंतर वीरूने संयमी फलंदाजी केली. परंतु, अल्पेश रामजीने मुंबई कस्टम संघाकडून गोलंदाजी करताना विरेंद्र सेहवागला ४८ धावांवर बाद करत संघाला यश मिळवून दिले. सेहवाग बाद झाल्यानंतर कॅग संघ ढासळत गेला आणि त्यांचा डाव १८४ धावांवर संपुष्टात आला.
धावांचा पाठलाग करताना मुंबई कस्टमकडून सचिन वाघने नाबाद ६७ धावांची खेळी साकारली. त्याला बालक्रिष्ण शिर्केने साथ देत २७ धावा ठोकल्या. सामन्याच्या अखेर बरोबरीत झाला. मुंबई संघानेही २० षटकांच्या अखेरीस ६ बाद १८४ धावांचा आकडा गाठला.