ट्विटरवर अत्यंत मोजक्या शब्दात अचूक मत व्यक्त करण्यात हातखंडा असलेल्या वीरेंद्र सेहवाग याची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतातील एन्ट्रीच सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. कारण सेहवागने प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केवळ दोन ओळींचा अर्ज पाठवला आहे. हा अर्ज एखाद्या ट्विटपेक्षाही लहान आहे. सेहवागचा हा अर्ज पाहून सुरूवातीला बीसीसीआयचे पदाधिकारीही काहीसे बुचकळ्यात पडले. मात्र, या सगळ्यातून सावरत बीसीसीआयने त्याला स्वत:ची पूर्ण माहिती असलेला रेझ्युमे पाठवायला सांगितला आहे.

सेहवागने प्रशिक्षकपदासाठी पाठवलेल्या अर्जात मोजून दोन ओळींचा उल्लेख आहे. मी आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असून सध्याच्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंसोबत खेळलो आहे, इतकी जुजबी माहिती सेहवागने अर्जात नमूद केली आहे. याविषयी बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने दि इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, सेहवागने केवळ दोन ओळींचाच अर्ज पाठवला होता. त्याच्यासोबत रेझ्युमेही पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे आम्ही त्याला अर्जाबरोबर सविस्तर माहिती असलेला रेझ्युमे पाठवण्यास सांगितले आहे. कारण तो पहिल्यांदाच बीसीसीआयच्या प्रशिक्षकपदासाठीच्या मुलाखतीला सामोरा जात आहे. लवकरच सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीकडून सेहवागची मुलाखत घेतली जाईल. सध्या सचिन आणि सौरव गांगुली इंग्लंडमध्ये असून व्हीव्हीएस लक्ष्मणही इंग्लंडला रवाना झाला आहे. मात्र, वीरेंद्र सेहवाग नुकताच भारतात परतला आहे. त्यामुळे ही मुलाखत स्काईपद्वारे पार पडणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी तीव्र स्पर्धा

आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेत उडी घेतल्यापासूनच या पदासाठी चुरस निर्माण झाली होती. सेहवागला स्पर्धा असेल ती ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मूडी आणि इंग्लंडच्या रिचर्ड पायबस यांची. माजी वेगवान गोलंदाज डोड्डा गणेश आणि भारतीय अ संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत हेही रिंगणात आहेत. अनिल कुंबळे यांची प्रशिक्षकपदाची मुदत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे. कोहली-कुंबळे वादामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. आधी या पदासाठी उत्सुक नसलेल्या सेहवागने आता पदासाठी अर्ज केल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. सेहवागबरोबरच टॉम मूडी, रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश आणि लालचंद राजपूत यांनीही पदासाठी अर्ज केले आहेत. सेहवागकडे प्रशिक्षकपदाचा अनुभव नसला तरी आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाला मार्गदर्शन केले आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठांनीच सेहवागला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.

माझं प्रशिक्षकपदाचं मानधन बीसीसीआयला झेपणार नाही- शेन वॉर्न

Story img Loader