२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या पराभवानंतर बरेच दिवस महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरु होती, मात्र धोनीने दोन महिने क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेत निवृत्तीच्या निर्णयावर काहीही न बोलणं पसंत केलं. यानंतर बीसीसीआयने विंडीज दौऱ्यासाठी ऋषभ पंतची यष्टीरक्षक म्हणून संघात निवड केली. तसेच यापुढे ऋषभ पंत पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असेल हे देखील निवड समितीने धोनीला स्पष्ट केलं. वेस्ट इंडिज दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या सामन्यात ऋषभला आपल्याला मिळालेल्या संधीचा फारसा चांगला लाभ घेता आला नाही. अनेक सामन्यांमध्ये तो झटपट माघारी परतला. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने, याच कारणासाठी ऋषभ पंतला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

“ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याला सर्वात प्रथम स्थिरावण्याची गरज आहे. त्याला आपल्या फटक्यांवर काम करण्याची गरज आहे, असं झालं तरच ऋषभ भारतीय संघात आपलं स्थान टिकवून राहिल.” ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग बोलत होता. ऋषभ पंतला विंडीजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र या संधीचा फायदा उचलणं त्याला जमलं नाही. त्यामुळे कसोटी मालिकेत ऋषभ पंत कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader