भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या कारकिर्दीत स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून तो फलंदाजी करत असे. फलंदाजीच्या विशेष शैलीमुळे त्याने आपल्या नावावर अनेक मोठमोठे विक्रम केले. इतकेच नव्हे तर निवृत्तीनंतर आता सेहवाग त्याच्या ट्विटरवरील फलंदाजीसाठी कायम चर्चेत असतो. त्याचे ट्विट्स कायम युझर्सच्या पसंतीस उतरतात.

अशाच प्रकारचे ट्विट आज पुन्हा एकदा सेहवागने केले आहे. भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधाराबाबत एक ट्विट त्याने केले आहे. भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सेहवागने भारतीय संघाच्या भविष्यातील कर्णधाराची जन्मतारीख काय असेल? हे सांगितले आहे.

त्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की ७ जुलै हा धोनीचा जन्मदिवस आहे. ८ जुलै हा सौरव गांगुलीचा जन्मदिवस आहे. तर १० जुलै हा सुनील गावस्कर यांचा जन्मदिवस आहे. आता ९ तारीख फक्त रिकामी आहे. याचा अर्थ भविष्यातील भारतीय संघाचा कर्णधार हा अजून जन्माला यायचा आहे किंवा कुठेतरी आपला वाढदिवस साजरा करत आहे. याबरोबरच ‘जुलै महिन्यात जन्माला या आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बना’, असा हॅशटॅग वापरत त्याने आपल्या खास शैलीचा पुन्हा एकदा अनुभव दिला.

तसेच, सेहवागने आज ट्विट करत गावस्कर यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यावेळी उंचच उंच गोलंदाज केवळ रन अप घेतानाच फलंदाजांना धडकी भरत असे, त्या काळात हेल्मेटही न वापरता त्या गोलंदाजांची धुलाई करणाऱ्या ‘दबंग’ फलंदाजाला हार्दिक शुभेच्छा, असे ट्विट त्याने केले आहे.

दरम्यान, आज क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही सुनील गावस्कर यांना मराठमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader