आपल्या खुमासदार आणि तिरसकर शैलीतील ट्विट्ससाठी प्रसिद्ध असणारा भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने नुकतीच विश्वचषक स्पर्धा गाजवून आलेल्या भारतीय महिला संघातील खेळाडुंची भेट घेतली. ही भेट वीरेंद्र सेहवाग आणि या महिला क्रिकेटपटू या दोघांसाठीही खास ठरली. यापूर्वी विश्वचषक स्पर्धेच्यावेळी वीरेंद्र सेहवाग वेळोवेळी महिला क्रिकेट संघ आणि खेळाडूंचे कौतुक करताना दिसला होता. एका चाहत्याने भारताची सलामीवीर स्मृती मंधानाला सेहवागचे ‘फिमेल व्हर्जन’ म्हटल्यानंतर सेहवागने स्मृती ही कुणाचीही नक्कल नसून, ओरिजिनल व्हर्जन असल्याचे म्हटले होते. एकूणच सेहवाग वेळोवेळी भारतीय क्रिकेट महिला संघाचे कौतुक करत आला आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, भारतीय संघाचा अंतिम फेरीपर्यंतचा कौतुकास्पद प्रवास पाहता काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या महिला खेळाडूंवर स्तुतीसुमनांचा आणि बक्षिसांचा वर्षाव झाला होता. या पार्श्वभूमीवर वीरूने शुक्रवारी या महिला क्रिकेटपटूंची भेट घेतली. देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या या मुलींना भेटून खूप आनंद वाटला, असे ट्विटही सेहवागने केले. सेहवागच्या या ट्विटवर उपांत्यफेरीत धडाकेबाज खेळ करणाऱ्या हरमनप्रीत कौरने आभार व्यक्त केले. आमचं आदरातिथ्य केल्याबद्दल धन्यवाद. एका एंटरटेनरला आम्ही एंटरटेन करू शकलो, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे हरमनप्रीतने म्हटले.
What a joy and pleasure to meet these wonderful girls who make us so proud.@ImHarmanpreet , @vedakmurthy08 Jhulan, Ekta,Poonam & Rajeshwari pic.twitter.com/2oG1oXbHvf
— Virender Sehwag (@virendersehwag) August 4, 2017
Thank You @virendersehwag Paaji for hosting us, It was our pleasure to Entertain the Entertainer.
मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात भारतीय संघाला यजमान इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी भारतीय महिला क्रिकेटला या स्पर्धेत एक विशिष्ट उंची प्राप्त करुन देण्यात मितालीला यश आले. त्यामुळेच पराभवानंतरही महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव झाला.