आपल्या हटके टि्वटमुळे नेहमीच चर्चेत राहणारा भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सामाजिक संदेश देणारा एक व्हिडिओ टि्वट केला आहे. मन हेलावून टाकणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित तुम्ही अन्न वाया घालवण्याआधी दहावेळा विचार कराल. आपण अनेकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर गरजेपेक्षा जास्त जेवण मागवतो आणि पोट भरले कि, ते अन्न वाया घालवतो. तसे करताना आपल्याला त्यावेळी काही वाटत नाही पण ज्यांना दोनवेळचे जेवण मिळत नाही त्यांच्यासाठी अन्न ही खूप मोठी गोष्ट आहे.

सेहवागने हैतीमधील अन्नासंदर्भातील भीषण परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ टि्वट करुन संदेश दिला आहे. हैतीमध्ये इतकी गरीबी आहे कि, तिथे लोक चिखलामध्ये मीठ मिसळून त्यापासून तयार केलेली रोटी खातात. त्यामुळे कृपया तुम्ही तुमचे अन्न वाया घालवू नका, तुम्हाला ज्या गोष्टीची किंमत नाही, तुम्ही जे गृहित धरता इतरांसाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांना गरज आहे अशा लोकांसाठी अन्नदान करा किंवा रोटी बँकमध्ये सहभागी होऊन गरजवंतांना अन्न उपलब्ध करुन द्या असे टि्वट सेहवागने केले आहे.

सेहवागच्या या व्हिडीओला तासाभरात एक हजारहून जास्त लोकांनी रिट्विट केले असून अनेकांनी कमेन्ट करुन सेहवागला समर्थन दर्शवले आहे.

Story img Loader