भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनलेल्या राहुल द्रविडच्या नियुक्तीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. द्रविड आणि सेहवाग यांनी एकाच काळात भारतीय संघासाठी क्रिकेट सामने खेळले आहेत. द्रविड प्रशिक्षकपदी आल्याने भारतीय संघात स्थैर्य येईल, असे सेहवागने म्हटले. त्याच्या मते, आता फक्त एका सामन्यात खराब कामगिरी केल्यानंतर खेळाडूंना संघातून वगळले जाणार नाही.
क्रिकबझवरील संभाषणादरम्यान, सेहवागने द्रविडच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “त्याच्या उपस्थितीमुळे संघात स्थैर्य येईल आणि आम्ही नेहमीच याबद्दल बोलत असतो. आता खेळाडूंना विश्वास असेल, की त्यांना लवकर वगळले जाणार नाही आणि त्यांना भरपूर संधी मिळतील. कारण द्रविडने नेहमीच खेळाडूला जास्त संधी दिली जाण्यावर विश्वास ठेवला आहे. आम्ही बऱ्याच दिवसांपासून बोलत आहोत, की खेळाडूंना आत्मविश्वास नाही आणि व्यवस्थापन खेळाडूंना साथ देत नाही. फक्त एका सामन्यानंतर त्यांना वगळले जात आहे. कदाचित राहुल द्रविड या बाबतीत खूप चांगला आहे आणि तो कोणत्याही खेळाडूला पूर्ण संधी देईल.”
हेही वाचा – शेन वॉर्नचं अश्लील कृत्य! टीव्ही शोमध्ये ‘तिनं’ केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, “५२ वर्षाचा हा माणूस…”
द्रविड या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेची जबाबदारी स्वीकारणार आहे. द्रविड प्रशिक्षक होण्याबाबत आधीच अटकळ होती. १९ वर्षांखालील संघासोबतही त्याने चांगली कामगिरी केली आणि संघाला विश्वचषक जिंकून दिला. भारतीय संघाला द्रविडकडून खूप आशा आहेत. भारताच्या संघाने गेल्या काही वर्षांपासून आयसीसीचे जेतेपद पटकावलेले नाही.
मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडचे मानधन सुमारे १० कोटी रुपये असेल, जी भारतीय क्रिकेट इतिहासातील कोणत्याही प्रशिक्षकाला दिलेली सर्वाधिक रक्कम आहे. सध्याच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत असल्याने बीसीसीआयने २६ ऑक्टोबर रोजी या पदासाठी अर्ज मागवले होते.