भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांच्या फलंदाजीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आयपीएलमध्ये काल मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईने आपल्या 153 धावांच्या आव्हानाचा बचाव करत कोलकाताला 10 धावांनी हरवले. विजयाच्या उंबरठ्यावर असताना कोलकाताकडून दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल फलंदाजी करत होते. मात्र, मु्ंबईच्या गोलंदाजांनी डावाच्या शेवटी भेदक मारा करत त्यांच्याकडून विजयाचा घास हिरावला.
मुंबई इंडियन्सच्य लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने 13 षटकांत 2 गडी गमावत 104 धावा अशी चांगली मजल मारली होती. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताला फक्त 31धावांची आवश्यकता होती. मात्र, मु्ंबईने हा सामना आपल्या बाजूने फिरवला. क्रिकबझवरील संभाषणादरम्यान वीरेंद्र सेहवागने कोलकाताच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली.
लाजिरवाणा पराभव – सेहवाग
सेहवाग म्हणाला, ”कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने सामना जवळपास जिंकला होता, परंतु शेवटी ते पराभूत झाले. जेव्हा आंद्रे रसेल फलंदाजीसाठी आला, तेव्हा संघाला कदाचित 27 चेंडूत 30 धावांची गरज होती. दिनेश कार्तिकने शेवटपर्यंत फलंदाजी केली, पण संघाला हा सामना जिंकता आला नाही. हा एक लाजिरवाणा पराभव आहे.”
सेहवागने दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेलच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभे केले. तो म्हणाला, ”ईऑन मॉर्गनने पहिल्या सामन्यानंतर सांगितले होते, की ते सकारात्मक खेळतील. पण आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिकच्या फलंदाजीदरम्यान असे काही जाणवले नाही. रसेल आणि कार्तिकने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यावरून असे वाटत होते, की त्यांना शेवटपर्यंत सामना घेऊन जायचा आहे आणि विजय मिळवायचा आहे, परंतु असे झाले नाही.”