टीम इंडियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तर खूप प्रसिद्ध होताच पण निवृत्तीनंतर ही तो त्याच्या वेगवेगळ्या कमेंट्स आणि अनोख्या ट्वीटमुळे खूप चर्चेत आहे. केवळ क्रिकेटच नव्हे तर चित्रपट, राजकारण अशा विविध गोष्टींबद्दल सेहवाग त्याचं मत मांडत असतो. त्याच्या खेळाप्रमाणेच त्याच्या वागण्यातील हा दिलखुलास अंदाज प्रत्येकालाच भावतो.
नुकतंच सेहवागने यूट्यूबवरील ‘द रणवीर शो’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये सेहवागने मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या क्रिकेट करकीर्दीविषयी, ट्रिपल सेंचुरीविषयी, सचिन आणि शोएब अख्तरबरोबरच्या मैत्रीविषयी आणि इतरही बऱ्याच खासगी गोष्टींविषयी सेहवागने मनमोकळ्या गप्पा मारल्या. सेहवागने मुलतानमध्ये २००४ साली केलेल्या ३०९ धावांबद्दल आणि त्यावेळी त्याने अनुभवलेल्या पाकिस्तानी लोकांच्या पाहूणचाराबद्दल खुलासा केला आहे.
आणखी वाचा : Virender Sehwag: ‘…म्हणून सचिनने मला लाइव्ह सामन्यात बॅटने मारले’, वीरेंद्र सेहवागने केला खुलासा
विषयी बोलताना सेहवाग म्हणाला, “तो दौरा आम्हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा होता कारण आणि खूप दिवसांनंतर पाकिस्तानमध्ये खेळायला गेलो होतो. त्यावेळी पाकिस्तानी लोकांनी तिथल्या चाहत्यांनी आम्हाला भरपूर प्रेम दिलं. तिथल्या राष्ट्रपतींना ज्यापद्धतीचं संरक्षण दिलं जातं तसंच आम्हाला दिलं होतं. पाकिस्तान दौऱ्यानंतर माझं लग्न होतं तर मला घरच्या काही महिलांसाठी जोडे, कपडे खरेदी करायचे होते. तेव्हा मी माझ्याबरोबर सेक्युरिटी घेऊन मार्केटमध्ये गेलो आणि शॉपिंग केलं, जेव्हा मी पैसे देऊ लागलो तेव्हा तिथल्या माणसाने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत, ते म्हणाले तुम्ही आमचे पाहुणे आहात तुमच्याकडून कसे पैसे घेणार.”
पुढे सेहवाग म्हणाला, “मी त्यांना बोललो की मला एखाद दूसरा जोड फ्रीमध्ये द्या, पण मला ३० ते ३५ जोड घ्यायचे आहेत. तरी त्यांनी माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही. कुमार विश्वास म्हणतात पाकिस्तान हा १९४७ नंतर निर्माण झाला, त्याआधी आपण एकच होतो. आज जरी दोन देश वेगळे असले, त्यांचं राजकारण वेगळं असलं तरी आजही दोन्ही देशातील देशवासीयांमध्ये आपल्याला प्रेम बघायला मिळतं.”