Virender Sehwag’s Big Statement on Shoaib Akhtar: भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहणे सर्वांनाच आवडते. दोन्ही संघांमधील सामन्याशिवाय काही वादविवादही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतात. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला त्याच्या जुन्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिले आहे. शोएब अख्तर आणि वीरेंद्र सेहवागमध्ये अनेकदा मैदानावर वाद होत असत.
आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही दोन्ही खेळाडू एकमेकांबद्दल काही ना काही विधाने करत असतात. तरी दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे. काही काळापूर्वी माजी पाकिस्तानी गोलंदाजाने वीरेंद्र सेहवागच्या केसांबाबत वक्तव्य केले होते. आता भारताच्या माजी सलामीवीराने अख्तरला उत्तर दिले आहे. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये सेहवागने अख्तरच्या विधानाला उत्तर दिले. शोमध्ये सेहवागला विचारण्यात आले होते की, तुमच्यात आणि शोएब अख्तरमध्ये वादांव्यतिरिक्त काही मैत्री आहे का?
आता माझे केस शोएब अख्तरच्या नोटांपेक्षा जास्त आहेत –
यावर सेहवाग म्हणाला, “जेथे प्रेम असते, तिथे मस्तीही असते. २००३-०४ मध्ये शोएब अख्तरशी माझी घट्ट मैत्री झाली होती. आम्ही तिथे दोनदा गेलो होतो, आणि तो दोनदा इथे आला होता. आम्ही मित्र आहोत, आम्ही एकमेकांचे पाय खेचतो. सेहवागच्या डोक्यावर असलेल्या केसांच्या संख्येपेक्षा माझ्याकडे जास्त नोट्स आहेत, असे त्याने एका निवेदनात म्हटले होते. आता माझे केस त्याच्या नोटांपेक्षा जास्त आहेत.”
वीरेंद्र सेहवागची क्रिकेट कारकीर्द –
वीरेंद्र सेहवाग भारतीय संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०४ कसोटी, २५१ एकदिवसीय आणि १९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५.०५ च्या सरासरीने ८२७३ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये, त्याने १४५.३८ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ३९४ धावा जोडल्या आहेत.