वीरेंद्र सेहवाग म्हटले की त्याची स्फोटक सलामी फलंदाजी लगेच डोळ्यासमोर येते. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्येही सलामी फलंदाजाची संकल्पना बदलली. अनेकवेळा तो चौकारापासून भारताच्या डावाची सुरुवात करत असे. कधीकधी तो लवकर बाद व्हायचा, तर कधीकधी तो डाव संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरून असायचा. आता रोहित शर्मा भारतीय संघाची सलामीची जबाबदारी सांभाळत आहे. रोहितही आक्रमक फलंदाज आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडमध्ये खेळताना आपल्याला नव्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे, असे सेहवागने सांगितले.

२००२मध्ये जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा सेहवागला अग्निपरिक्षेतून जावे लागले होते. नॉटिंगहॅममध्ये खेळलेल्या दुसऱ्या कसोटीत सेहवागने संयमी फलंदाजी करत १८३ चेंडूत १०६ धावा तडकावल्या होत्या. टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध १८ जूनपासून खेळवला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला भाग घ्यावा लागेल. या सामन्यांसाठी टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला डावाच्या सुरुवातीस अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सेहवागने मत दिले आहे.

 

काय म्हणाला सेहवाग?

एएनआयशी बोलताना सेहवाग म्हणाला, ”जेव्हा मी प्रथम इंग्लंडमध्ये सलामी दिली, तेव्हा मी फार आक्रमक नव्हतो. स्विंगच्या अटींमुळेच १५०-१६० चेंडूत माझे शतक पूर्ण झाले. तेथे यशस्वी व्हायचे असल्यास तुम्हाला अटी व नवीन चेंडूचा आदर करावा लागेल. जर आपण सपाट ट्रॅक किंवा गवत असलेल्या खेळपट्टीवर खेळत असाल तर दोघांमध्ये खूप फरक आहे. इंग्लंडमध्ये बरेच काही स्थितीवर अवलंबून असते. ढगाळ वातावरण असल्यास चेंडूबरोबर काहीही होऊ शकते, परंतु तापमान जास्त असल्यास फलंदाजी करणे सोपे होईल.”

हेही वाचा – Video : सामना सुरू असतानाच शाकिब अल हसनने काढून फेकले स्टंप; अंपायरच्या निर्णयावर भडकला

”रोहितने इंग्लंडच्या परिस्थितीचा आदर करावा आणि खराब चेंडूची वाट पाहावी. तो इंग्लंडमध्ये खूप क्रिकेट खेळला असून त्याच्याकडे अनुभवाची कमतरता नाही. काय करावे लागेल हे त्याला माहीत आहे. नवीन चेंडूचा आदर कर आणि खराब चेंडूची वाट बघ. ५ ते १० षटके फलंदाजी केल्यानंतर तो सेट होतो. त्यानंतर तेथे आक्रमक क्रिकेट खेळणे सोपे होईल”, असा सल्ला सेहवागने रोहितला दिला आहे.

Story img Loader