भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला मुलाखतीसाठी धमकी दिल्यानंतर पत्रकाराला खडसावले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघातून वगळल्यानंतर साहाला आता धमक्या येत आहेत. साहाला व्हॉट्सअॅपवर एका पत्रकाराकडून ही धमकी मिळाली आहे, ज्याचा स्क्रीनशॉट साहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पत्रकार त्याला मुलाखतीसाठी धमकावत असल्याचे यष्टिरक्षक आणि फलंदाज असणाऱ्या साहाचे मत आहे.

साहाचे ट्विट शेअर करताना सेहवागने पत्रकाराला जोरदार फटकारले आहे. “हे खूप दुःखद आहे. अशा प्रकारे कोणाच्या भावना दुखावल्या जातात. ना तो आदरास पात्र आहे ना तो पत्रकार आहे. फक्त एक चमचेगिरी.” वृद्धि आम्ही तुझ्या सोबत आहोत, असे सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यष्टीरक्षक फलंदाज साहाने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पत्रकाराने, “तू माझ्यासोबत एक मुलाखत करशील. ते चांगले होईल. त्यांनी (निवडकर्त्यांनी) फक्त एकच यष्टिरक्षक निवडला आहे. सर्वोत्तम कोण आहे. तू ११ पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जो माझ्या मते योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकेल अशा एकाची निवड कर. तू कॉल केला नाहीस मी तुझी यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही आणि मी ते लक्षात ठेवीन,” असे म्हटले आहे.

यावर साहाने त्या पत्रकाराला उत्तर दिले आहे. ‘भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर.. एका तथाकथित ‘प्रतिष्ठित’ पत्रकाराकडून मला अशा गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे! पत्रकारिता इथेच संपते, असे साहाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी साहाला संघात स्थान मिळालेले नाही. यानंतर त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर निशाणा साधला आहे.साहाने शनिवारी सांगितले की, गांगुलीने आपल्याला भारतीय संघातील आपल्या स्थानाची चिंता करू नये, असे आश्वासन दिले होते.

दरम्यान, ३७ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज साहा आणि १०० हून अधिक सामन्यांत खेळलेल्या वेगवान गोलंदाज इशांतला कसोटी संघात स्थान नसेल, हे संकेत आधीच निवड समितीने दिले होते. पुजारा आणि रहाणेच्या निवडीचीही अंधूक शक्यता वर्तवण्यात आली होती. संक्रमणाचे धोरण आखत निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी नवी संघबांधणी केली आहे.

राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीवर निशाणा

“संघ व्यवस्थापनाने मला यापुढे संघ निवडीत विचार केला जाणार नाही असं सांगितलं. जोपर्यंत मी भारतीय संघाच्या सेटअपचा भाग होतो तोपर्यंत मी हे सांगू शकत नव्हतो,” असा धक्कादायक खुलासा वृद्धिमान साहाने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. “प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही मला निवृत्ती घेण्याबद्दल विचार करण्याचा सल्ला दिला,” असे वृद्धिमान साहाने म्हटलं आहे.

वृद्धिमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीविरोधातही संताप व्यक्त केला. गांगुलीने आपल्याला संघातील स्थान पक्कं असून, चिंता करु नको अशा शब्द दिला होता असा दावा वृद्धिमान साहाने केला आहे.