केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात आपल्या देशाचं इंडिया हे नाव हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. देशाचं नाव इंडियाऐवजी भारत असं केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. क्रिकेट विश्वातूनही यावर एक महत्त्वाची प्रतिक्रिया आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने यावर सूचक ट्वीट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली असून १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. याची माहिती देणारं एक ट्वीट बीसीसीआयने केलं आहे. हे ट्वीट रीट्वीट करत सेहवाने म्हटलं आहे की टीम इंडिया नाही, टीम भारत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आपण विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा यांचा जयजयकार करणार आहोत. ते करत असताना आपल्या मनात भारत असायला हवा. आपले खेळाडू भारत असं लिहिलेली जर्सी घालून मैदानात उतरतील.

वीरेंद्र सेहवागच्या या ट्वीटवर एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे. या याहत्याने म्हटलं आहे की गौतम गंभीरच्या आधी तू खासदार व्हायला हवं होतंस असं मला नेहमी वाटतं.

चाहत्याच्या या कमेंटवर विरूनेही प्रतिक्रिया दिली आहे. विरू म्हणाला, मला राजकारणात बिलकूल रस नाही. मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये देशातल्या दोन्ही मोठ्या पक्षांनी (भाजपा आणि काँग्रेस) माझ्याशी संपर्क साधला होता. परंतु, मला असं वाटतं की मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी आणि खेळाडूंनी राजकारणात येऊ नये. कारण त्यांच्यापैकी बहुतेकजण हे त्यांच्या वैयक्तिक महत्त्वकांक्षा आणि सत्तेच्या भूकेपायी राजकारणात येतात आणि क्वचितच लोकांना वेळ देतात. याला काही अपवाद आहेत, परंतु, यातले बहुतांश लोक फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी राजकारणात येतात.

हे ही वाचा >> World Cup मध्ये टीम इंडिया ‘भारत’ नावाने मैदानात उतरणार? वीरेंद्र सेहवागच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चेला उधाण

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, मला क्रिकेट आवडतं आणि क्रिकेटमध्येच गुंतून राहायला आवडेल. तसेच क्रिकेट समालोचन करणं मला आवडतं. आपल्या सोयीनुसार पार्ट टाईम खासदार व्हायला मला आवडणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag take dig at gautam gambhir says part time mp whenever convenient asc