अबू धाबी येथे २३ मार्चपासून सुरू होणाऱ्या डरहॅमविरुद्धच्या चार दिवसीय चॅम्पियन काऊंटी सामन्यात मेरिलीबोर्न क्रिकेट क्लबचे (एमसीसी) नेतृत्व भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी झगडणाऱ्या वीरेंद्र सेहवागकडे सोपवण्यात आले आहे.
‘‘पुढील महिन्यात अबू धाबी येथे होणाऱ्या या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि मुथय्या मुरलीधरन एमसीसी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत,’’ असे एमसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यानंतर अमिराती ट्वेन्टी-२० स्पध्रेत मुरलीधरन एमसीसीचे नेतृत्व करणार आहे. इंग्लंडचा मॉन्टी पनेसार, श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज प्रसन्ना जयवर्धने यांचासुद्धा एमसीसीच्या संघात समावेश आहे.
लॉर्ड्सच्या द्विशताब्दीवर्षपूर्तीनिमित्त ५ जुलैला एमसीसी विरुद्ध शेष विश्व यांच्यात होणाऱ्या सामन्यातही सेहवाग खेळणार आहे. तो म्हणतो, ‘‘या सामन्यात मला खेळण्याची संधी मिळणे हा आनंदाचा क्षण आहे. एमसीसीचे नेतृत्व करायला मिळणे, हा एक प्रकारे सन्मान आहे.’’