भारताच्या एकदिवसीय संघातून वगळलेला तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागला इराणी चषकासाठी शेष भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले आहे. रणजी चषक विजेत्या मुंबईच्या संघाबरोबर शेष भारताचा सामना ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान वानखेडेवर होणार आहे. शेष भारतीय संघात सुरेश रैना, मनोज तिवारी, हरभजन सिंग, एस. श्रीशांत यांना स्थान देण्यात आले असले तरी युवराज सिंगला मात्र संधी देण्यात आलेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावेळी शेष भारतीय संघाबरोबरच अध्यक्षीय इलेव्हन आणि भारतीय ‘अ’ संघाचीही घोषणा केली आहे. भारतीय ‘अ’ संघात मुंबईच्या रणजी विजेतेपदात मोलाची भूमिका वठवणाऱ्या धवल कुलकर्णीला भारतीय ‘अ’ संघात स्थान देण्यात आले आहे, धवलबरोबर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही मुंबईकर या संघात आहेत.
वाईट कामगिरीमुळे सेहवागला इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आले होते. शेष भारतीय संघाचे कर्णधारपद देऊन निवड समितीने त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शेष भारतीय संघात हरभजन आणि श्रीशांत यांनाही संधी देण्यात आली असून या सामन्यात चांगली कामगिरी केल्यास त्यांना भारतीय संघात पुनरागमन करता येऊ शकते. फॉर्मात नसलेला सलामीवीर गौतम गंभीर याला यावेळी एकाही संघात स्थान दिलेले नाही. झहीर खान आणि उमेश यादव यांनी अजूनही त्यांच्या तंदुरूस्तीचे प्रमाणपत्र मंडळाला पाठवले नसल्याने त्यांचा विचार या संघनिवडीसाठी करण्यात आलेला नाही. दुखापतीतून सावरलेल्या मनोज तिवारीला शेष भारताबरोबरच ऑस्ट्रेलियाविरूद्ध सराव सामना खेळणाऱ्या भारतीय ‘अ’ संघात स्थान देण्यात आले आहे.
वरीष्ठ निवड समितीने बंगळुरू येथे शेष भारत संघाची घोषणा केली. या संघात सहा फलंदाज, सहा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आणि वृद्धिमान साहा या यष्टीरक्षकाचा समावेश केला आहे. या संघाबरोबर ऑस्ट्रेलियासंघाबरोबर सराव सामने खेळणाऱ्या भारतीय ‘अ’ आणि बोर्ड अध्यक्षीय संघाची घोषणा करण्यात आली. अध्यक्षीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर अभिनव मुकुंदला देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध अध्यक्षीय संघ दोन दिवसीय सराव सामना १२ आणि १३ फेब्रुवारीला चेन्नई येथे खेळणार आहे. जम्मू आणि काश्मिरचा युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलचा अध्यक्षीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर रणजी स्पर्धेत पाच शतकांसह दमदार कामगिरी करणारा पंजाबचा सलामीवीर जीवनज्योत सिंगची भारतीय ‘अ’ संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय ‘अ’ संघ १६-१८ फेब्रुवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाविरूद्ध चेन्नई येथे तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.
शेष भारत : वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, मनोज तिवारी, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, हरभजन सिंग, एस. श्रीशांत, प्रग्यान ओझा, इश्वर पांडे, अभिमन्यू मिथून, अंबाती रायुडू, शामी अहमद आणि जलाज सक्सेना.
अध्यक्षीय इलेव्हन : अभिनव मुकुंद (कर्णधार), रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, मनदीप सिंग, केदार जाधव, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, सरबजित लढ्ढा, परवेझ रसूल, मोहम्मद शामी, परविंदर अवाना आणि कमलेश मकवाना.
भारत ‘अ’ : शिखर धवन (कर्णधार), जीवनज्योत सिंग, रोहित शर्मा, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, सी.एम. गौतम, राकेश ध्रुव, जलाज सक्सेना, मनप्रीत गोणी, विनय कुमार, धावल कुलकर्णी आणि अशोक मनेरिया.
शेष भारत संघाच्या कर्णधारपदी सेहवाग हरभजन आणि श्रीशांत यांना संघात स्थान
भारताच्या एकदिवसीय संघातून वगळलेला तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागला इराणी चषकासाठी शेष भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आलेले आहे. रणजी चषक विजेत्या मुंबईच्या संघाबरोबर शेष भारताचा सामना ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान वानखेडेवर होणार आहे.
First published on: 29-01-2013 at 07:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag to lead rest of india in irani trophy