वयानुसार नजर कमजोर होत जाते आणि मग त्याच्यासाठी पर्याय म्हणून चष्मा डोळ्यांवर चढतो. सध्या धावांच्या दुष्टचक्रात हरवलेला वीरेंद्र सेहवागने सराव शिबिरात चष्मा घालून सराव केला आणि साऱ्यांच्याच नजरा त्याच्याकडे वळल्या. सेहवाग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही चष्मा घालून खेळणार का, यावर चर्वितचर्वण सुरू असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेहवाग चेन्नईत २२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात चष्मा घालूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करणार आहे.
सेहवागने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सराव करताना चष्मा लावला होता. पहिल्या कसोटी सामन्यातही तो चष्मा घालणार आहे, पण त्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या पावलावर पाऊल ठेवत तो ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ बसवणार आहे, असे सूत्रांकडून समजते.
सेहवागला यापूर्वी कानांची समस्या जाणवली होती, त्याला एका कानाने कमी ऐकू येत होते. त्यानंतर आता नजर कमजोर झाल्यामुळे त्याला सध्या तरी चष्मा घालून खेळावे लागणार आहे. भारतीय संघात चष्मा घालून खेळणारा सेहवाग काही पहिला खेळाडू नाही. यापूर्वी माजी सलामीवीर पंकज रॉय आणि अंशुमन गायकवाड हे चष्मा घालून खेळलेले आहेत. त्याबरोबर माजी डावखुरे फिरकीपटू दिलीप जोशी, माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि सौरव गांगुली हेदेखील यशस्वीरीत्या खेळले आहेत. पण सेहवागला या नवीन बदलामुळे फायदा होतो की तोटा, हे पहिल्या सामन्यानंतरच कळू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा