माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचाही अर्ज; लालचंद राजपूत, टॉम मूडी आणि रिचर्ड पायबसही रिंगणात
आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांच्या उरात धडकी भरवणारा भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या स्पर्धेत उडी घेतल्याने या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. सेहवागला स्पर्धा असेल ती ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मूडी आणि इंग्लंडच्या रिचर्ड पायबस यांची. माजी वेगवान गोलंदाज डोड्डा गणेश आणि भारतीय अ संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत हेही रिंगणात आहेत.
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघावर सध्या कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाचे सावट आहे. अनिल कुंबळे यांची प्रशिक्षकपदाची मुदत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर संपुष्टात येत आहे. कोहली-कुंबळे वादामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. आधी या पदासाठी उत्सुक नसलेल्या सेहवागने आता पदासाठी अर्ज केल्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. सेहवागबरोबरच टॉम मूडी, रिचर्ड पायबस, डोड्डा गणेश आणि लालचंद राजपूत यांनीही पदासाठी अर्ज केले आहेत. सेहवागकडे प्रशिक्षकपदाचा अनुभव नसला तरी आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाला मार्गदर्शन केले आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठांनीच सेहवागला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा आग्रह धरल्याचे समजते.
कोण करणार निवड?
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेली बीसीसीआयची सल्लागार समिती भारताच्या प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे. हे तिघे कुंबळेसाठी पुन्हा अनुकूल असले तरी सध्याच्या वादग्रस्त परिस्थितीत कुंबळेऐवजी अन्य व्यक्तीलाच प्राधान्य दिले जाण्याची शक्यता अधिक आहे.
.. तर रवी शास्त्री यांच्याकडे धुरा
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंबळे यांच्या जागी प्रशिक्षकपदासाठी योग्य व्यक्ती सध्याच्या प्रक्रियेतून मिळाला नाही, तर रवि शास्त्री यांची थेट निवड करण्यात येईल. रवि शास्त्री यांनी मात्र पदासाठी उत्सुकता दर्शवलेली नाही. परंतु विराट कोहली शास्त्री यांच्या नावाला अनुकूल आहे.
कोहली-कुंबळे वाद नाहीच
विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात वाद निर्माण झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात यात काहीही तथ्य नसल्याचे मत बीसीसीआयचे सहसचिव अमिताभ चौधरी यांनी व्यक्त केले आहे. चौधरी सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून कोहली-कुंबळे वादात मध्यस्थी करण्यासाठी त्यांना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, प्रशिक्षकपदाची मुदत संपल्यानंतर कुंबळे यांना पुन्हा या पदासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे.
गुहा यांचा राजीनामा
प्रख्यात इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी वैयक्तिक कारणास्तव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कारभार व्यवस्थित चालण्यासाठी नेमलेल्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मात्र भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे भवितव्य अधांतरी आहे, या प्रकरणाशी याचा संबंध असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.