भारतीय संघाचा फलंदाज विरेंद्र सेहवाग गेल्या काही सामन्यांमध्ये अगदी स्वस्तात बाद झाला. त्याच्या या ‘ऑफ परफॉरमन्स’ कामगिरीचा फटकाही त्याला बसला. ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सेहवागला डच्चू देण्यात आला होता. आता इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी सेहवाग आता भारतीय संघात खेळताना दिसेल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे.
इंग्लंडमध्ये होणा-या आयसीसीच्या चॅम्पियन करंडकासाठीचा तीस जणांचा संभाव्य भारतीय संघ घोषित करण्यात आला. त्यातही सेहवागला स्थान मिळू शकले नाही. “मला वाटते की सेहवाग आता भारतीय संघात खेळताना दिसेल असे वाटत नाही. याचे कारण असे की, भारतीय संघाला आता योग्य मार्ग मिळाला आहे. ते युवा फलंदाजांना संधी देत आहेत.” असे जेफ्री यांनी इएसपीएन वाहिनीवर एका क्रिकेट कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
 एप्रिल २०१२ पासून आतापर्यंत सेहवाग खेळलेल्या एकूण आठ कसोटी सामन्यांत त्याने ३१.३८च्या सरासरीने फक्त ४०८ धावा केल्या आहेत. तर याच काळात सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये ३०.५ च्या सरासरीने फक्त १८३ धावा तो करु शकला आहे.

Story img Loader