भारताचा स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या सलामीवीर विरेंद्र सेहवागने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पुढील वर्षी त्याच्या निवृत्तीला दहा वर्षे पूर्ण होतील. मात्र, आजही विरेंद्र सेहवाग सतत काहीना काही कारणाने चर्चेत असतो. आजही त्याच्या कारकिर्दीतील कितीतरी धडाकेबाज खेळींची आठवणी काढली जाते. पुढील अनेक वर्षे क्रिकेट चाहत्यांच्या मनात त्याच्या आठवणी राहतील. पण, सेहवागच्या कारकिर्दीत एक असा क्षण आला जेव्हा त्याने अचानक क्रिकेटला रामराम ठोकण्याचा विचार केला होता. मात्र, सचिन तेंडुलकरने त्याला असे करण्यापासून थांबवले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरेंद्र सेहवागने २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्यावेळी भारताचा तत्कालीन कर्णधार एमएस धोनीने त्याला काही सामन्यांसाठी वगळले होते. त्यानंतर, सेहवागने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. क्रिकबझ या क्रीडा वेबसाईटवरील ‘मॅच पार्टी’ नावाच्या कार्यक्रमामध्ये सेहवागने याबाबत खुलासा केला आहे. सेहवाग म्हणाला की, “२००७ मध्ये जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियात होतो तेव्हा माझ्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मी कसोटी मालिकेत पुनरागमन केले होते आणि १५० धावा केल्या होत्या. मात्र, एकदिवसीय सामन्यांमध्ये मी तीन-चार प्रयत्नांत धावा करू शकलो नाही. त्यामुळे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मला संघातून वगळले. यामुळे एकदिवसीय क्रिकेट सोडण्याचा विचार माझ्या मनात आला. मी फक्त कसोटी क्रिकेट खेळत राहण्याचा विचार केला होता.”

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करणाऱ्या सेहवागचे मन वळवण्याचे काम सचिन तेंडुलकरने केले होते. “त्यावेळी सचिन तेंडुलकरने मला थांबवले होते. हा तुझ्या आयुष्यातील एक वाईट टप्पा आहे. जरा थांबं. या दौऱ्यानंतर घरी परत जा. खूप विचार कर आणि मग पुढे काय करायचे ते ठरव, असा सचिनने मला सल्ला दिला होता”, असा खुलासा सहवागने केला. सुदैवाने मी माझी निवृत्ती जाहीर केली नाही, असेही तो म्हणाला.

२००८नंतर सेहवाग भारताकडून भरपूर क्रिकेट खेळला. २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषकही जिंकण्यातही त्याने हातभार लावला. विराट कोहली क्रिकेटमधून बाहेर जाण्याचा विचार करत असेल का? असा प्रश्न विचारल्यानंतर सेहवागने आपल्या आयुष्यातील ही गोष्ट उघड केली आहे.